Nagpur : मिहानमधील कंपन्यांचा कोंडला श्वास

मिहानमधील कंपन्यांचा कोंडला श्वास
मिहान
मिहानsakal
Updated on

नागपूर : तब्बल दोन दशकांपासून अडथळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या मिहान-सेझ प्रकल्पातील उद्योगांचा पायाभूत सुविधांअभावी श्वास कोंडला जात आहे. विकास आयुक्त व्ही. श्रमण यांच्या अध्यक्षतेखाली भागधारकांची बैठक झाली. त्यात कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यामुळेच मिहानमध्ये येणारी गुंतवणूक दुसरीकडे जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला.

एमएडीसी नागपूर कार्यालयात ऐकण्यासाठी कोणीच नसल्याची बहुतांश प्रतिनिधींची तक्रार होती. वर्षानुवर्षे फाइल नागपूर कार्यालयातच धुळखात आहेत. याबाबत कंपन्यांच्या संचालकांकडून पाठपुरावा केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मिहानच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचा सूर बैठकीतून उमटला. आमच्या अडचणी मिहानचे स्थानिक प्रशासन ऐकत नाही. संपूर्ण काम मुंबईच्या मुख्यालयातून चालते असे म्हणून कायम बोळवण करत असल्याची तक्रार आहे. नागपूरचे कार्यालय हे फक्त पोस्टाचा डब्बा झाल्याचे वृत्त ‘सकाळ''ने अधिवेशनाच्या काळात प्रकाशित करून सरकारचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, आठवड्यातून एकदा मुंबईचे अधिकारी नागपुरात येतील आणि कंपन्यांच्या तक्रारी सोडवतील असे आदेश काढण्यात आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन वर्षे प्रतीक्षा करूनही जमिनीचे वाटप झालेले नाही, त्यामुळे कंपन्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. मिहानमध्ये येणारी गुंतवणूक दुसरीकडे गेली आहे. जोड रस्तेही तयार झाले नसल्याने पाच ते सात महिन्यांपासून युनिटचे काम सुरू करता येत नसल्याचे काही संचालकांनी सांगितले.

फाइल लटकत ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे का? असा प्रश्नही त्यांनी विकास आयुक्तांना विचारल्याची माहिती आहे. बैठकीत एमएडीसीचे अधिकारी वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारख, माजी अध्यक्ष शिवकुमार राव, नवीन मल्लेवार, निशांत गांधी, मनोहर भोजवानी, शंतनू पुराणिक, मनोहर कोरडे, नरेंद्र अग्रवाल, अजय उत्तरवार, दिलीप पटेल, आंचल सुरी उपस्थित होते.

अनेकदा झाले अपघात

एमएडीसीचा कारभार मुंबईतून चालविला जात आहे. त्यामुळे प्रकल्पाबद्दल नकारात्मकता तयार होत असून कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित होत आहे. एकीकडे कंपन्या सुविधा वाढवण्याची मागणी करीत आहेत तर दुसरीकडे एमएडीसीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. त्यामुळे प्रकरणे अधिक गुंतागुंतीची होत आहेत. परिसरात वाढलेल्या झुडपांमुळे कंपन्यांच्या रस्त्यावर दररोज सकाळ-संध्याकाळ गाई-म्हशींचा मुक्त संचार असतो. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे गंभीर अपघातही झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.