नागपूर : प्लॅटफॉर्मवर पोहोचविण्याकरिता बॅटरीवर चालणारी गाडी वेळेवर उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरातील एका आमदाराच्या पुत्राने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून सोमवारी रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी मात्र काहीच बोलायला तयार नाही.
आमदार पुत्राच्या धमकीमुळे महिला कर्मचारी चांगलीच धास्तावली असून काही महिन्यांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. तिला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानी दिली.
नागपुरातील एका नेत्याचा पुत्र सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील उपस्टेशन प्रबंधक कार्यालय (वाणिज्य) येथे आला. फलाटावर पोहोचविण्यासाठी बॅटरीवर चालणारी गाडीची मागणी त्याने कार्यालयात उपस्थित महिला कर्मचाऱ्याला केली. मात्र, गाडी एका व्यक्तीसाठी पूर्वीच गेल्याने मिळण्यास उशीर झाला असे तिने सांगितले. त्यामुळे नेता पुत्राचा पारा चढला. त्याने उपस्थित महिला कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आपण ‘एका मोठ्या नेत्याचा पुत्र आहो. तुम्ही मला ओळखत नाही का?’ असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच मारण्याचीसुद्धा धमकी दिली.
यासंदर्भात वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आपल्याकडे अजूनपर्यंत अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. याप्रकाराने इतरही कर्मचारी धास्तावले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा परिसरात होती. ऐरवी रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफार्मवर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस गस्तीवर असतात. खाकीचा जोर दाखवितात. आज मात्र, एवढी मोठी घटना झाल्यानंतरही एकही सुरक्षा व्यवस्थेतील जवान मदतीसाठी धावला नाही. कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. काहीच झाले नाही असे दाखवत सर्वच सारवासारव करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.