नागपूर : वीज बिलाचा ग्राहकांना शॉक

अव्वाच्या सव्वा बिल, रीडिंगबाबत ग्राहकांमध्ये संशय
electricity bill
electricity billsakal
Updated on

नागपूर - आधीच महागाईने होरपळत असलेल्या नागरिकांना महावितरणकडून वीज बिलाचा शॉक मिळत आहे. जास्त बिल येत असल्याबाबत ग्राहकांची ओरड असून वीज मीटर रीडिंगबाबतही ग्राहकांचा आता संशय वाढू लागला आहे.

मे महिन्यात कुलर, एसी सुरु राहत असल्याने वीज बिलात वाढ होते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, जे कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालविण्यासाठी मे महिन्यात १५ दिवस बाहेरगावी होते, त्यांनाही नियमितपणे येणाऱ्या बिलासारखेच जास्त बिल पाठविण्यात आले आहे. विजेचा वापर नसतानाही अतिरिक्त बिल आल्याने वापरकर्त्यांमध्ये बिलाबाबत संशय निर्माण झाला आहे. महावितरणकडून नियमित महिन्याचे सरासरी बिल जोडून तर पाठविण्यात येत नाही ना? असा संशय आता ग्राहकांमध्ये बळावला आहे. वीज बिल जास्त येत असल्याची अनेक ग्राहकांची ओरड आहे.

बजेटच कोलमडले

आधीच नागरिक महागाईने त्रस्त झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दर महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशा स्थितीत विजेच्या वापरापेक्षा जास्त बिल येत असल्याने आणि बिल न भरल्यास पुरवठा खंडित करीत असल्याने महावितरण विरोधात ग्राहकांची मोठी नाराजी आहे.

सरासरीनुसार तर बिल नाही?

दोन खोल्यांचे घर असलेल्या आणि दोन लाइट, पंखा आणि केवळ उन्हाळ्यात कुलरच चालत असताना दर महिन्यात २ हजाराच्या वर बिल येत असल्याने महावितरणवर ग्राहकांची नाराजी आहे. दर महिन्यात सरासरी बिल पाठविण्यात येत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.

अचूक नोंद होते का?

बऱ्याच ग्राहकांनी मिटर रीडिंगबाबतही संशय निर्माण केला आहे. अचूक मीटर रीडिंग बिलावर नोंदविले जाते का, याबाबतही ग्राहकांना फारसे माहिती नसते. मीटर रीडिंग घेणारे बाहेरूनच फोटो काढून निघून जातात. बरेचदा घरमालकाला याची माहिती सुद्धा नसते. त्यामुळे नेमके रीडिंग किती? याचा अंदाज ग्राहकांना येत नाही.

रीडिंग घेणारी एजन्सी बडतर्फ

गेल्या दोन महिन्यांपासून रीडिंगमध्ये सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे आदी प्रकार दिसून आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडतर्फ केले आहे. तसेच महावितरणच्या संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूर परिमंडळातही मीटर रीडिंगबाबत ग्राहकांना संशय आहे.

इंधन अधिभार यंदा लागला असल्याने वीज बिलात वाढ झाली आहे. अचूक मीटर रीडिंग संदर्भात आढावा घेण्यात येत आहे.

-अमित परांजपे, अधिक्षक अभियंता, नागपूर शहर मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.