Nagpur News : राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असून प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीनंतर महापालिकाही ‘अलर्ट मोड’वर आली आहे. नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळणे तसेच लक्षणे आढळल्यास चाचणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.
मागील दोन आठवड्यांत राज्यात पुन्हा कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. रुग्णांची संख्या मोठी नसली तरी शासनही गंभीर झाले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीम यांनी राज्यातील महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी नागपुरातून बैठकीला हजेरी लावली. महापालिकेतील अधिकारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी जवळपास पाऊण तास बैठक घेतल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत महापालिकेला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची पुस्तीही या अधिकाऱ्यांनी जोडली.
यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनीही कोरोना संदर्भातील जुनी आकडेवारी काढणे सुरू केले असून विस्मरणात गेलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या कागदांवरील धूळ झटकणे सुरू केले. महापालिकेने आता नागरिकांनाही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय लक्षण दिसल्यास चाचणी करण्याच्या सूचनाही नागरिकांना करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ हा वाढत असल्याने यासंदर्भात नव्या सूचना एक, दोन दिवसांत येणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ८० ऑक्सिजन खाटा असून १६ आयसीयू बेड्स आहेत. तसेच आयसोलेशन रुग्णालयामध्ये ३० ऑक्सिजन बेड्स आहे. पाचपावली स्त्री रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून ११० ऑक्सिजन बेड्स आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.