नागपूर : महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची पोलिसात तक्रार करणारे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात नवा ‘ट्विस्ट’ आला. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट संकेत दिले.
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत असून महापौरांनी गठीत केलेल्या समितीने महापौरांकडे अहवाल सोपविला असून येत्या सभागृहात पटलावर ठेवण्यात येणार आहे. या घोटाळ्याची तक्रार डॉ. चिलकर यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. बनावट बिले जोडून हा घोटाळा करण्यात आला.
आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आतापर्यंतच्या पोलिस तपासात तक्रारकर्त्याचीच भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. याबाबत काल, शनिवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट संकेत दिले. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांची चौकशी झाल्यास आणखी मोठी नावेही पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संवादाची क्लिप ताब्यात, अस्वस्थता वाढली
आरोग्य विभागातील दोघांनी मोबाईलवर केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आर्थिक व्यवहारावर दोघांत चर्चा झाल्याचे संवादातून पुढे आले आहे. या संवादातील ते दोघे कोण? हे जाणून घेण्यासाठी लवकरच व्हॉईस टेस्ट घेतली जाणार आहे.
इतर विभागाच्या तक्रारी
आरोग्य विभागातील घोटाळ्याच्या तारा इतर विभागात जुळल्या आहेत. त्याचीही चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखा पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. महापालिकेकडून अधिकृत अहवाल आला नसल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. अहवाल मिळाल्यास तपासात मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.