नागपूर - वादग्रस्त निर्णयामुळे नागपूरकरांच्या कायमच लक्षात राहणारे तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे नागपुरातून गेले. परंतु सिवेज लाईन दुरुस्तीसाठी त्यांनी तयार केलेला नवा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग कुचकामी ठरला आहे. सिवेज लाईन तुंबल्याने नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी साचत असून तक्रारींची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे आता नागरिक महापालिकेच्या निषेधार्थ रस्त्यांवर आंघोळ करीत आहेत.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे नागपुरात येण्यापूर्वी शहरातील सिवेज लाईन तुंबणे, सांडपाण्याच्या समस्यांची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे होती. दहाही झोनमधील आरोग्य अधिकारी, स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात फिरणारे झोनमधील जमादार हे नागरिकांनी सिवेज लाईन तुंबल्याची तोंडी तक्रार केल्यानंतर लगेच दखल घेत होते. समस्येवर तत्काळ किंवा एका दिवसांत तोडगा काढून नागरिकांचे समाधान केले जात होते.
परंतु कठोर प्रशासकीय निर्णय घेणारे तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत नवीन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाची स्थापना केली. या विभागाला शहरातील सिवेज लाईन तुंबणे, दुरुस्ती, नवीन सिवेज लाईन टाकणे आदीची जबाबदारी दिली. यासंबंधातील तक्रारी सोडविण्याची जबाबदारीही याच विभागावर दिली. या विभागात कनिष्ठ अभियंता, उपअभियंता,
अभियंता असे अधिकारी आहेत. परंतु ज्या गतीने आरोग्य विभागातील जमादार काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सिवेज लाईन तुंबल्याच्या समस्यांचे निराकरण करीत होते, ते गांभीर्य या अभियंत्यांमध्ये नसल्याचे दररोजच्या तक्रारी व नागरिकांच्या रोषावरून दिसून येत आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांत सिवेज लाईन तुंबणे, घरांमध्ये सांडपाणी जमा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली.
आता तर नागरिक महापालिकेच्या निषेधार्थ रस्त्यांवर आंघोळ करीत आहेत. नुकताच सोनेगाव येथील ७२ वर्षीय सुरेश लिखार यांनी संताप व्यक्त करीत रस्त्यावरच आंघोळ केली. त्यांच्या घरी सांडपाणी परत येत असून बाथरूममध्ये आंघोळीची सोय राहिली नाही. एवढेच नव्हे प्रातःविधीलाही जाणे अशक्य असल्याने त्यांनी रस्त्यावर आंघोळ करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यातून नागरिकांमधील संतापाची लाट दिसून येत आहे.
आंघोळच नव्हे, प्रातःविधीही करणार लिखार
महापालिकेच्या निषेधार्थ नुकताच ७२ वर्षीय सुरेश लिखार यांनी रस्त्यावर आंघोळ केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. परंतु समस्या कायम आहे. सोमवारी महापालिकेला पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. समस्या सुटली नाही तर रस्त्यावर आंघोळच नव्हे तर प्रातःविधीही करणार, असा इशारा पत्रातून देणार असल्याचे संतप्त लिखार म्हणाले.
दोन विभाग न करण्याच्या सूचनेकडे केले दुर्लक्ष
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात अभियंते आहेत. ते कधीच प्रत्यक्ष ठिकाणावर जात नाही. जमादाराकडे जबाबदारी नसल्याने तेही ऐकत नाही. दुपारे ले-आऊटमध्ये १५ दिवसांपासून सिवेज लाईन तुंबली होती. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दखल घेतली, असे सोनेगाव परिसरातील माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे यांनी सांगितले. दोन विभाग करू नये, या सूचनेकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावी जबाबदारी
सिवेज लाईन तुंबण्याचे प्रकार व त्यामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप बघता याबाबतची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. निवृत्त झालेले अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ व्हावा, यासाठी त्यांची सेवा घेण्याची महापालिकेत परंपरा आहे. अशाच निवृत्त अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.