नागपूर - पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी आणि रस्त्यांसाठी कोट्यवधी खर्च झाल्याची बतावणी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात भांडेवाडी लगतच्या वस्त्यांमध्ये हा विकास नेमका कुठे आहे? असा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षांपासून येथील नागरिकांना पडला आहे. या वस्त्यांमधील रहिवाशांच्या नशिबी चांगले रस्तेही नाहीत.
सर्वसामान्यांनी आपल्या मिळकतीतून अंतुजीनगर, अब्बुमियानगर, तुलसीनगर आणि सूरजनगर या परिसरात जागा घेत त्यावर घरे बांधली. नेत्यांनीही त्यांच्या मतांचा वापर करीत त्यांना प्रत्येकवेळी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या परिसरात साधा रस्ताही तयार झाला नाही. प्रत्येकवेळी कोट्यवधीचा निधी खर्च केल्याची बतावणीही केल्या जाते. प्रत्यक्षात तो निधी जातो कुठे ? हा प्रश्न आहे. सातत्याने नगरसेवक या भागात निवडणुकांच्या वेळी येतात. त्याही वेळी रस्ता, पिण्याच्या पाण्याचा समस्या सोडवू, असे सांगून निघून जातात. मात्र, आजपर्यंत या समस्या ‘जैसे थे’ आहेत. पावसाळ्यामध्ये परिसरात रस्त्यांवर पाणी साचते.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पावसाळ्यात परिसरातील रस्त्यांवर पाणी साचते. तेच पाणी घरातही शिरते. साचलेल्या पाण्यात डास आणि किड्यांची पैदास होत असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रत्येक घरात तापाचे रुग्ण आणि दूषित पाण्यांमुळे डायरिया आणि इतर रोगांचे परिसरात थैमान असते. दुसरीकडे प्रशासनाकडून त्यासाठी काहीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हायटेन्शन लाइनमुळे नागरिकांच्या जिवाला धोका
अंतुजीनगर, अब्बुमियानगर, तुलसीनगर या परिसरातून हायटेन्शन लाईन जाते. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाला सांगण्यात आले आहे. मात्र, राजकारणी आणि प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.
भांडेवाडी स्टेशनजवळ वाहनांची पार्किंग
प्रभाग क्र २८ भांडेवाडी मधील अंतुजी नगर, अब्बूमिया नगर, तुलसी नगर, न्यू सूरज नगर मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, घराकडे परतणाऱ्यांना आपली वाहने १ ते २ किलोमीटर लांब भांडेवाडी स्टेशनवर ठेवावी लागतात.
अनेकदा प्रशासनाला या परिसरातील परिस्थितीची माहिती दिली. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. आताही पावसाळ्यात हीच परिस्थिती असून त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
- प्रशांत ढाले, सामाजिक कार्यकर्ता
गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात विकास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची पावसाळा सुरू झाला की घरापर्यंत पोहचण्याची कसरत सुरू होते. अनेक लहान मुलांचे अपघात या परिसरात झाले असून त्यापासून प्रशासन धडा घेताना दिसून येत नाही.
- जयंत धोपटे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.