नागपूर : सलग आठ दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने अंबाझरी तलावाची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या भीतीने या भागातील नागरिकांनी आपला संसार वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. घरातील महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवून इतर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.
या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका सतर्क आहे. त्यासाठी चार पंप आणि दोन ठिकाणांवरून अंबाझरीतून पाणी नदीत सोडण्यात येत आहे. ही कायमस्वरूपी उपाययोजना मात्र नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप आहे.
मागील वर्षी ३ सप्टेंबरला शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नाग नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे अंबाझरी लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, यशवंतनगर, डागा लेआउटसह आसपासच्या परिसरांतील वस्त्यांमधील घरे पाण्याखाली आली होती.
परिणामी, घरातील वस्तूंसह, दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. महालक्ष्मी, गणपतीही वाहून गेले होते. या पुरात नागनदीच्या संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले होते. पुरानंतर प्रशासनाकडून पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना अपेक्षित होत्या.
मात्र, नाग नदीची स्वच्छता, क्रेझी कॅसलमध्ये नदीच्या प्रवाहात अडथळा ठरलेले पूल वगळता कुठल्याही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. पुराच्या दहा महिन्यानंतरही नागनदीची संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही.
नाल्याच्या संरक्षण भिंत आणि पुलाचे कामे संथ गतीने सुरु आहे. पुन्हा एकदा अंबाझरी तलावाची पातळी वाढली. मुसळधार पाऊस झाल्यास तलाव ओव्हरफ्लो होऊन पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नागरिकांकडूनच खबरदारी घेण्यात येत आहे.
दोन मजल्यांचे घर असलेल्यांकडून महत्त्वाचे साहित्य व वस्तू वरच्या माळ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. अनेकांनी वरच्या मजल्यावरच नियमितपणे राहणे सुरू केले आहे, अशी माहिती कैलाश नरवाडे यांनी दिली.
या भागात दोनमजली घरे असलेल्यांकडून उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी काही घरांमध्ये अशी कुठलीही व्यवस्था नाही. त्यांच्याकडून दोनमजली घर असलेल्या शेजाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे किंवा नातेवाईक व मित्र मंडळींकडे निवासाच्या व्यवस्थेचा प्रयत्न सुरू आहे. पाऊस आला तर या परिसरातील नागरिक आताही भितीत रात्र काढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.