नागपूर : अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना कार्यक्रम २०२२ अंतर्गत १२ वनविभाग वगळून उर्वरित वनविभागात एक नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश दिलेले आहे. त्या प्रगणनेच्या आदेशाला स्थगित देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी म. रा. वनरक्षक व पदोन्नत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांच्या कार्यालयात दिले.
व्याघ्र प्रगणनेबाबत महिप गुप्ता यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलून नव्याने आदेश काढू, असे सकारात्मक आश्वासन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय व्याघ्र प्रगणेतील ट्रान्झिट लाईन प्रणालीमध्ये त्रुटी आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्याच्या जिवितास धोका असल्याचे अनेकदा उघडकीस आलेले आहे. त्यामुळे या पद्धतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात ट्रान्झिट लाईननुसार प्रगणना करताना स्वाती ढुमने या वनरक्षकास हौताम्य आले.
पहिल्या टप्प्यातील चवथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी सलग तीन दिवस ट्रान्झिट लाइनवर सकाळी नऊ वाजताचे आत जावे लागते. याकरिता सकाळी चार ते पाच वाजताचे आत पूर्वतयारीने व्याघ्र गणनेतील वनरक्षक व वनपाल यांना कोणत्याही सुरक्षेशिवाय व्याघ्र प्रकल्पात जावे लागते. ३२ विभागापैकी १२ वनविभागाची माहिती अचूक व २० वन विभागाची माहिती चुकीची असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.
यातील तीन प्रमुख त्रुटींमध्ये पायी चालणे, ट्रान्झिट लाईनमधील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा विष्टा गोळा करणे, पायी ठसे घेणे, मानवी हस्तक्षेपासह इतर माहिती प्रपत्रनिहाय लिहिणे हे करता न आल्याबाबत प्रामुख्याने उल्लेख दिसून येतो. ताडोबा- अंधारी येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण पाऊस अधिक झाला असून सगळीकडे झाडा झुडपामध्ये मोठे गवत वाढलेले आहे.
ट्रान्झिट लाईन ही एकाच सरळ रेषेत जावे लागते. त्यामुळे सखल, उंच आणि दऱ्याखोऱ्यातूनही भौगोलिक परिस्थितीनुसार जावे लागते. हे जोखीमेचे आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) यांनी १ ते ६ नोव्हेबर दरम्यान, नियोजित व्याघ्र गणना करण्याबाबत सूचना केलेली आहे. वन कर्मचाऱ्यांमध्ये वाढलेल्या भीतीमुळे या प्रगणेच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.