कुलगुरूविरोधात तक्रारीवर राज्य सरकारने मागितला खुलासा

डॉ. सुभाष चौधरींच्या अडचणीत वाढ
Nagpur University Subhash Chaudhary
Nagpur University Subhash Chaudhary
Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरोधात झालेल्या तक्रारींच्या आधारावर चौकशीसाठी पाठविण्यात आलेल्या उपसचिवांनी अहवाल सादर केला.

त्यातील शिफारसीनुसार राज्य सरकारने कुलगुरूंना ८ दिवसात खुलासा मागितला आहे. याशिवाय बांधकामात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात डॉ. सुभाष चौधरी यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे बुधवारीच त्यांना उच्च न्यायालयाने फटकारले होते.

‘एमकेसीएल’ आणि विद्यापीठातील विविध प्रकरणांबाबत आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि प्रवीण दटके यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय प्रवीण दटके यांनीही ‘एमकेसीएल’ला पैसे देण्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवण्यात येत असल्याची बाब उपस्थित केली होती.

यासंदर्भात उच्चशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बारस्कर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने १६ व १७ सप्टेंबरला तक्रारकर्ते आमदार, व्यवस्थापन परिषद माजी सदस्य विष्णू चांगदे, ॲड. मनमोहन वाजपेयी आणि शिवानी दाणी यांच्याशी चर्चा केली. याआधी कुलगुरूंसह अन्य अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेण्यात आली.

विशेष म्हणजे, ‘एमकेसीएल’सह कुठलीही निविदा न काढता दिलेल्या कोट्यवधींच्या कामाची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. सर्व बाबींची चौकशी व पाहणी करून उपसचिव अजित बारस्कर यांनी २७ सप्टेंबरला चंद्रकांत पाटील यांना अहवाल सादर केला. हा अहवाल नकारात्मक असून यामध्ये विद्यापीठात झालेल्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

यावर राज्य सरकारने कुलगुरूंवर कारवाई सुरू केली. १७ ऑक्टोबरला तसे आदेश काढून सर्व तक्रारींवर आठ दिवसांत कुलगुरूंनी खुलासा द्यावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकाराने प्रशासनाच्या चुकांमुळे शतकोत्तर वर्षात विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असल्याने शैक्षणिक वर्तुळात टीका होत आहे, हे विशेष

या कामाची होणार चौकशी

विद्यापीठातील विविध कामांच्या निविदा न काढता काम देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. विकासकामांच्या नावावर यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात राज्य शासनाने कठोर भूमिका घेत, या वित्तीय अनियमिततेबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, विद्यापीठ अधिनियम लेखा संहितेनुसार अधिकची चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कुलगुरूंनी राजीनामा द्यावा

कुलगुरू सुभाष चौधरी यांच्यावर सिनेट सदस्यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी राज्य शासनाकडून लावण्यात आली होती. त्या चौकशी च्या अहवालानुसार राज्य शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रकरणात तथ्य असल्याची त्यावरून लक्षात येते. तेव्हा त्यांनी राजीनामा देत, विद्यापीठाची व स्वतःची प्रतिष्ठा वाचवावी अशी प्रतिक्रिया सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी दिली आहे.

शिफारसीनुसार कार्यवाही सुरू

विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एमकेसीएलला विनानिविदा परीक्षेसंदर्भातील काम देणे, परीक्षा विलंब, देयके अदा करणे याबाबत व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व प्रशासकीय प्रमुख म्हणून कुलगुरूंची मुख्य जबाबदारी असल्याने या मुद्याच्या कार्यवाहीबाबत आठ दिवसांत कुलगुरूंनी खुलासा सादर करावा, असे शासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.