नागपूर : विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्र लाट पसरली आहे. गारठ्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच दहा अंशांच्या खाली आहे. मंगळवारी महाबळेश्वरपेक्षाही नागपूरची थंड शहर म्हणून नोंद करण्यात आली. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.
कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैदर्भींना आता खऱ्या अर्थाने तीव्र हिवाळा जाणवू लागला आहे. याचा अनुभव दोन दिवसांपासून नागपूरकरांनाही येत आहे. मंगळवारी अचानक तापमानात ३.४ अंशांची घसरण होऊन पारा या मोसमात प्रथमच ९.४ अंशांवर आला. उल्लेखनीय म्हणजे, उपराजधानीत नोंद झालेले हे किमान तापमान राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून गणल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही (१२.६ अंश सेल्सिअस) तीन अंशांनी कमी होते.
राज्यात सर्वाधिक थंडीची लाट सध्या विदर्भातच दिसत आहे. मंगळवारी गोंदिया व यवतमाळ येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात नीचांकी अर्थात ९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लाटेचा तीव्र प्रभाव दिसून येत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागातीलच नव्हे, शहरवासीही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहात असल्यामुळे स्वेटर व जॅकेट घालून फिरावे लागत आहे. शिवाय थंडी घालविण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
हवामान विभागाने या आठवड्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून वैदभींची सुटका शक्य नाही. उत्तर भारतात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मैदानी भागांमध्ये थंडीची लाट आली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
जिल्हा- किमान तापमान
गोंदिया -९.०
यवतमाळ -९.०
नागपूर -९.४
वाशीम -१०.०
गडचिरोली- १०.६
चंद्रपूर -११.०
ब्रम्हपुरी- ११.४
वर्धा- ११.४
अमरावती -१२.५
बुलडाणा -१२.८
अकोला -१३.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.