Race Across India : ‘रेस ॲक्रॉस इंडिया’मध्ये नागपूरचे १४ सायकलपटू; १० ऑक्टोबरपासून ३,७५८ कि.मी पर्यंतचा प्रवास

Race Across India : नागपूरच्या १४ सायकलपटूंचा ‘रेस ॲक्रॉस इंडिया’मध्ये समावेश असून, ही शर्यत १० ऑक्टोबरपासून श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत ३,७५८ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात विविध वयोगटांच्या सायकलपटूंची सहनशक्तीची परीक्षा घेतली जाणार आहे.
Race Across India nagpur
Race Across India nagpursakal
Updated on

नागपूर : इंडियन ऑइलपुरस्कृत दुसरी ‘रेस ॲक्रॉस इंडिया’ ही भारतातील सर्वात लांब व प्रतिष्ठित अल्ट्रा सायकलिंग शर्यत येत्या १० ऑक्टोबरला श्रीनगर येथून आरंभ होत आहे. श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंतच्या या शर्यतीत नागपूरच्या १४ जणांसह देशविदेशातील सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

एकूण ३७५८ किलोमीटर अंतराची ही शर्यत असून, सहभागी सायकलपटू दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडूसह विविध १२ प्रमुख राज्यांतून प्रवास करीत कन्याकुमारीला पोहोचणार आहेत. शर्यत बर्फाच्छादित हिमालयातून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जाणार आहे.

शिवाय मार्गात थंड, उष्ण व दमट वातावरणासह प्रमुख नद्या व चढ-उतार राहणार असल्याने सर्व स्पर्धकांच्या सहनशक्तीची एकप्रकारे परीक्षा घेणारी राहणार आहे. या शर्यतीला वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनची मान्यता असून, शर्यत पूर्ण करणारे सर्व स्पर्धक जगप्रसिद्ध ‘रेस ॲक्रॉस अमेरिका’साठी पात्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘रेस ॲक्रॉस इंडिया’मध्ये वैयक्तिक श्रेणी (सोलो), रिले आणि टीम इव्हेंट असे तीन प्रकार राहणार आहेत. रिलेमध्ये दोन, तर टीम इव्हेंटमध्ये एकूण चार स्पर्धकांचा समावेश असेल. वैयक्तिक गटासह नागपूरचे तीन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

वयोगटानुसार ठरले वेळापत्रक

वैयक्तिक स्पर्धकाला १२ दिवसांत, चार जणांच्या संघाला आठ दिवसांत, दोन जणांच्या संघाला दहा दिवसांत तसेच ६० वर्षांवरील वैयक्तिक सायकलपटूला १३ दिवसांत रेस पूर्ण करावी लागणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा शर्यतीला हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जयंत मेंढी, दिलीप वरकड, नितीन वराडपांडे, प्रशांत देशकर, मुकुंद कामत, रुपेश मेश्राम, अश्विन मेंढी व विश्वास चाटी उपस्थित होते.

शर्यतीत सहभागी शहरातील स्पर्धक

यंदाच्या शर्यतीत नागपुरातून प्रथमच १४ सायकलपटू सहभागी होणार आहेत. यात अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ, सर्वाधिक ६५ वर्षे वयाचे जयंत मेंढी, दिलीप वरकड, रुपेश मेश्राम, मुकुंद कामत, विश्वास चाटी, डॉ. प्रफुल्ल वानखडे, डॉ. अनघा चोपडे, डॉ. अनुपम अग्निहोत्री, नितीन वराडपांडे, प्रशांत देशकर, विपीन नाईक, गोविंद भास्कर व स्वीटी मलिक यांचा समावेश आहे. याशिवाय देशातील इतरही राज्यांसह पोलंड व केनियामधूनही सायकलपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.