वानाडोंगरी (जि. नागपूर) : गरिबीचे चटके सहन करीत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अर्थार्जनासाठी नोकरी प्राप्त केली. मात्र, आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते. नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावत असताना एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. शिकवणीशिवाय वैभवनगर या झोपडपट्टीत राहणाऱ्या नरेश गिरघुसे यांनी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करुन राज्यात चवथा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल नरेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्याच्या उपराजधानीला अगदी लागून असलेल्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वैभवनगरमध्ये नरेश मुरलीधर गिरघुसे राहतो. नरेश यांनी पहिली ते चवथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण वानाडोंगरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. शिक्षण महात्मा गांधी हायस्कूल वानाडोंगरी या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हिंगण्यातील नेहरु कनिष्ठ महाविद्यालयात घेतले. येथील इतिहासाचे प्रा. सुरेश गुडघे यांनी नरेशला एमपीएससी परीक्षेबद्दल माहिती दिली होती. नरेशने बारावीनंतर डीएड केले. परंतु, मुलाने 'अधिकारी' व्हावे ही आईची इच्छा होती. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे आधी आर्थिक समस्या सोडविणे गरजेचे होते. त्यामुळे २०११मध्ये तो एसआरपीएफमध्ये पोलिस शिपाई म्हणून भरती झाला. आता आर्थिक समस्या सुटल्यामुळे त्याने काही मित्रांच्या सहकार्यांने नक्षलग्रस्त भागात नोकरी सांभाळून व वेळेचे नियोजन करुन एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.
हेही वाचा - "सरकारला मका विकून आम्ही गुन्हा केला का?";...
नरेशचा डिएडचा मित्र गोविंद डर्फे हा पुण्याला एमपीएससीची शिकवणी लावून पीएसआय परीक्षेची तयारी करीत होता. त्याच्याकडून नोट्स प्राप्त करुन व मार्गदर्शन घेऊन २०११ ते २०१७ पर्यंत सलग सहा वर्ष अभ्यास केला. २०१६ ला भरत वर्मा या अजून एका मित्राची पीएसआय या पदावर नियुक्ती झाली. त्याचेसुद्धा मार्गदर्शन लाभले व २०१७ला पीएसआय परीक्षेची जाहिरात आली. निश्चय केला आणि नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावत जसा वेळ मिळेल तसा रात्रंदिवस अभ्यास केला. या काळात सुमेध थुल यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. आधी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. ३००पैकी२६२ गुण प्राप्त करुन मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. शारीरिक चाचणीसाठी नागपूर येथील नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे कोच जितू घोराडकर व भाऊ काणे तसेच शारीरिक चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात हिंगण्यातील एचटीकेबीएसचे प्रमुख मार्गदर्शक राजेश भुते यांच्या मार्गदर्शनाखली मुकुल बिल्लोरे यांनी त्यांच्या वैयक्तिक वेळेनुसार वेळ काढून प्रशिक्षण दिले. नरेशला शारीरिक दुखापत झाली असतानाही शारीरिक चाचणीमध्ये १००पैकी१०० गुण मिळाले. अशाप्रकारे ४००पैकी३६२ गुण प्राप्त करुन पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात चवथा आला.
माझ्या यशात माझी आई शकुंतला गिरघुसे, बहिणी भारती व वैशाली, माझे बाबा, माझे शिक्षक व सहकार्य करणाऱ्या मित्रांचा फार मोठा वाटा आहे. मी सदैव यांचा ऋणी असेल.
-नरेश गिरघुसे, पोलिस उपनिरीक्षक, हिंगणा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.