National Doctor's Day 2024 : जवळच्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी देवाचा धावा सुरू असतो. जेथे सर्व आशा मावळतात, तेथे डॉक्टरांना देवदुताची उपमा दिली जाते. तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात देव देव्हाऱ्यात नाही, तर रुग्णालयात पीपीई किटमध्ये कोरोनाशी लढताना दिसला होता.
मात्र, काळ बदलला अन् जीव वाचल्यानंतर डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी जोडलेले हात देवपण नाकारत त्यांच्यावर वार करण्यासही मागेपुढे बघत नाही. अशा घटनांवेळी या देवदुतांना वाचवण्यासाठी कायद्याचा आधार दिला गेला. परंतु त्याचाही मनस्ताप डॉक्टरांनाच होतो. यामुळे डॉक्टरांच्या मानसिक अवस्थांचे सकारात्मक ऑडिट करून त्यांच्या वेदनांशी नाते जोडण्यासाठी समाजमन कधी तयार होईल, असा सवाल चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला.
‘डॉक्टर डे’ च्या पार्श्वभूमीवर काही निवडक डॉक्टरांशी ‘सकाळ’ने संवाद साधल्यानंतर त्यांनी मन मोकळे केले. महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होते. वर्षभरात ७२ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले.
जीवनदान देणारे डॉक्टर अशा घटनांचे बळी ठरतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका मानसोपचार तज्ज्ञांने ९ डॉक्टरांचे समुपदेशन करीत असल्याची माहिती दिली. एका झोपविकार तज्ज्ञाकडे डॉक्टर झोपेवरील औषधोपचार घेत आहेत.
कोरोनासारखी माहामारी आली की, या योद्ध्यांसाठी टाळ्या वाजवल्या जातात. त्यांच्या कामाचे कौतुक होते. फुलांचा वर्षाव होतो. पण शंभर रुग्णांना बरे करताना एक अनुचित घटना घडली की, डॉक्टर वाईट ठरतो. मारहाण होते. समाजातील हे विदारक चित्र पुसले जावे. डॉक्टरही हाडामासाचा माणूस आहे, ही संवेदना समाजाने जपावी.
-डॉ. उदय बोधनकर, बालरोग तज्ज्ञ नागपूर.
आधुनिक तंत्राच्या माध्यमातून डॉक्टर रुग्णसेवेच्या भूमिका बजावत आहेत. अशक्य आजारांवर मात करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेच्या दृष्टीतून बघण्याची दृष्टी समाजामध्ये निर्माण झाल्यास डॉक्टरांना ऊर्जा मिळेल. डॉक्टरांना निर्भयतेने रुग्णसेवा करू दिल्यास कठीण प्रसंगावर मात करता येते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून ते जपले पाहिजे.
-डॉ. आनंद संचेती, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ, नागपूर.
जिवंतपणी विविध आजारांमुळे वेदनांवर फुंकर घालण्याचे काम डॉक्टर करतात. शस्त्रक्रियेतून आजारच समूळ उपटून टाकण्याचे काम डॉक्टर करतात. अपघातात, दीर्घ आजाराने मृत्यूच्या दारातील रुग्णांना जीवनदान देण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करतात. कोरोना काळात पीपीई किटमध्ये जीव गुदमरत असताना रुग्णसेवेसाठी ते तैनात होते. मात्र अनुचित घटना घडल्यानंतर डॉक्टरच टीकेचे धनी झाले. हे बरोबर नाही.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.