नागपूर : तब्बल तीन महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदीत बंद ठेवण्यात आलेली केशकर्तनालये (सलून) रविवारी (ता. 28) हवी ती काळजी घेत उघडण्यात आली आणि आलेल्या ग्राहकांच्या डोक्यावरील वाकडे तिकडे, विस्कटलेले, हिप्पीसारखे वाढलेले केस 'स्टाइलीश' कापून देत कारागिरांनी पहिल्या दिवसाच्या कामाचा श्रीगणेशा केला. आता नियमित केशकर्तनालये सुरू राहणार असल्याने त्यांचाही हसरा चेहरा "आरशात' नक्कीच बघायला मिळणार आहे. प्रशासनाच्या "कात्रीत' अडकण्याची भीती असतानाही काहींनी सवयीप्रमाणे दोन-चार हात डोक्यावर मारून घेतल्यावर (कचकच बोटे मोडत) "कहे घबराये, कहे घबराये, इस चम्पी में बड़े बड़े गुन' असेही सांगायला कारागीर विसरले नाही.
आर्थिक संकटात सांपडलेल्या नाभिक समाजाने दर वाढविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवीन दर पाहून अनेक ग्राहकांचे केस 'उभे' झाले. त्यामुळे केशकर्तनालये कर्मचाऱ्यांनाही ते 'कापायला' (खिसे) सोपे गेले. दुप्पट झालेले दर पाहून अनेकांनी वाढलली दाढी कुरवाळत 'ये क्या हुवा कैसे हुआ, कब हुआ, क्यूँ हुआ' असे म्हणत 'राग' आवळला.
शहरात तब्बल दोन हजारपेक्षा अधिक केशकर्तनालये आहेत. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मागील साडेतीन ते चार महिन्यांपासून बंद असलेल्या केशकर्तनालयेमुळे अनेकांनासमोर रोजीरोटीचा प्रश्न 'कैचीत' सापडला होता. बंद असलेल्या दुकानांमुळे अनेकांनी घरीच 'घोटत' डोक्यावरील 'भार' हलका केला असला तरी केशकर्तनालयावर अवलंबून कुटुंबीयांची मात्र परवड होत होती.
केशकर्तनालयात केवळ केस कापणे, केस रंगवणे या सेवांना परवानगी आहे. त्वचेसंबंधी सेवा आदी यांना सध्या परवानगी नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील वाढलेली खुंट मात्र घरीच आरशासमोर उभे राहत त्यावर वस्तरा फिरवत कापावे लागणार आहे.
नवीन नियमानुसार केशकर्तनालयात दाढी "घोटायला' परवानगी दिली नाही. म्हणून ज्यांना दाढी जमत नाही त्यांना काही दिवस ती तशीच ठेवावी लागणार असून, त्यांनी स्वत:ला अनिल कपूर, कबीर बेदी, सैफी अली म्हणत मिरवावे.
प्रशासनाने केशकर्तनालयाची निश्चित वेळ ठरविली आहे. त्यामुळे वेळेत केस कापणे झाले नाही तर "दुकान बंद नका करजान, शटर खाली करून, मायी कटिंग पुरी करून देजा' असा ग्राहकाचा किस्सा सलून कारागिर संजय यांनी हसत हसत सांगितला.
केसाला आणि खिशाला दोघांनाही कात्री तरी ग्राहक खूश होता, असे संतोष अमृतकर या सलून चालकाने सांगितले. बऱ्याच दिवसांपासून 'उजडे चमन', 'बाला' बनून लक्ष वेधून घेतलेल्या तरुणांनी थोडा 'कट' मारत केसांना "वळणावर' आणले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.