नागपूर : कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने कुटुंबातील सर्वच घरी आहेत. ही जरी आनंदाची बाब असली तरी प्रेमीयुगुलांसाठी हा प्रकार त्रासदायक ठरतोय. एरव्ही प्रियकर आणि प्रेयसीच्या भेटीगाठी रोज आणि नियमित होत असल्याने एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा सोबत वेळ घालविण्यासाठी पुरेशी संधी मिळत होती. मात्र, आता लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे प्रेमीयुगुलांची ताटातूट होत असून "विरह' सहन होत नसल्याने मुलींचे प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिस ठाण्यातील माहितीनुसार, 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या मिसिंगचे प्रमाण वाढले आहे. मुलींचे आई-वडील मुलगी पळून गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदवीत आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
पोलिसांचा मोठा स्टाफ कोरोनामुळे बंदोबस्तात लागला असल्याने पाहिजे तेवढे लक्ष मिसिंगच्या तक्रारींवर देण्यात येत नसल्याचे सत्य समोर आले. अल्पवयीन मुली प्रेम करीत असलेल्या मुलांसोबत पालकांच्या विरोधात जाऊन पळून जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसही अशा पळून जाणाऱ्या प्रेमीयुगुलांना शोधण्यासाठी जास्त परिश्रम घेत नाहीत.
प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सोपे असते. कारण त्यांना भविष्याबाबत योग्य ती जाण नसते. प्रियकर आपल्यावर जीव ओवाळून टाकतोय म्हणजे तो "हिरो' आहे, असा मुलींचा समज असतो. वयात येत असताना लग्नाबाबत आकर्षणही असते. दोघेही पळून नातेवाईकाकडे जातात किंवा कुठेतरी कामाच्या शोधात निघून जातात. मात्र, महिन्या-दोन महिन्यातच त्यांच्या मुलीला संसाराचे चटके बसू लागतात. परंतु, घरी परतण्याची इच्छा असूनही त्यांना घराची वाट धरता येत नाही.
मुली वयात येत असताना शारीरिक बदलांसह शारीरिक आकर्षण प्रामुख्याने प्रेमात पडणाऱ्यांसाठी जबाबदार असते. टीव्ही, चित्रपट आणि सोशल मीडियामुळे "प्रेम करणे म्हणजे तरूणाईचा हक्क' अशी समजूत झाली आहे. चित्रपटातील "अंतरंग दृष्य' आणि जाहिरातील मॉडेल्सचे बोल्डनेस याचाही परिणाम बालमनावर पडतो आहे. त्यामुळे प्रेमात पडल्यानंतर पळून जाण्यासाठी मुलांपेक्षा मुली जास्त उत्सूक असतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तहसील हद्दीत राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला हिचे मुक्का ऊर्फ शाहरूख खान याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांच्याही घरच्यांना याबाबत माहिती होती. कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास शाहरूखने त्या मुलीला घेऊन दुचाकीने पळ काढला. तहसील पोलिस ठाण्यात शाहरुखवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पारडी हद्दीत राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिचे वस्तीत राहणाऱ्या अमन कनोजिया याच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नव्हता. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे दोघांच्या भेटी होत नव्हत्या. तसेच सर्व जण घरी असल्याने फोनवरही बोलणे कमी होत होते. दोघांनी एकमेकांसोबत राहता यावे, यासाठी पळून जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता अमनने दुचाकीने त्या मुलीसह पळ काढला. पारडी पोलिस ठाण्यात अमनवर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे.
नंदनवनमधील 17 वर्षीय युवती 9 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता तयारी करून बाहेर पडली. चौकात गेल्यानंतर तिचा प्रियकर दुचाकी घेऊन तेथे आला. दोघेही दुचाकीने पळून गेले. ती रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने तिच्या पालकांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तिचे अपहरण झाल्याची तक्रार केली.
भावनिक संवाद हरवतोय
पालकांना सतत सल्ले देण्याची सवय असते. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या पाल्यावर पालक नेहमी आरडाओरड करतात. त्यांच्यातील भावनिक संवाद हरवतोय. पालक पैसा कमविण्यासाठी बाहेर पडत असल्याने मुलांवर दुर्लक्ष होते. पालक मुलांसोबत केवळ काम किंवा अभ्यासबद्दल बोलतात. त्यांच्या चुका काढण्याच्या सवयीला मुले कंटाळतात. चोवीस तास सतत सूचना आणि सल्ले ऐकून मुलांना फ्रिडम हरविल्यासारखे वाटते. यासोबत तारुण्य सुलभ भावना आणि घरातून आटलेला प्रेमाचा ओलावा, या सर्व बाबी मुलींना पळून जाण्यासाठी भाग पाडतात.
प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.