पारशिवनीचा ‘विकास’ कुठं राह्यते भाऊ? शोधून बी सापडत नाही जी! 

PARASHIWANI
PARASHIWANI
Updated on

पारशिवनी (जि. नागपूर) ः पारशिवनी ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये होऊन अनेक वर्षे झालीत, मात्र आजही पारशिवनी शहर पूर्वीप्रमाणेच पहाला मिळत आहे. शहरात कुठलेच परिवर्तन झाल्याचे कुठेही दिसत नाही. शहरात नगरपंचायत झाल्यापासून शहराचा विकास कुठे हरवला तेच कळत नाही. 

पारशिवनी हे अनेक वर्षांपासून तालुक्याचे ठिकाण आहे. असे असतानाही या शहरात वर्षानुवर्षे अनेक प्रश्‍न ‘आ’ वासून उभे आहेत. शहरातील अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटता सुटत नाही. अनेक प्रभागांमध्ये सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असते. त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले नजरेस पडतात. मुलांना खेळण्यासाठी शहरात कुठेही क्रीडांगण नाही. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे आणि कसे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अनेक प्रभागांत पिण्याच्या पाण्याची सोय आजपर्यंत करण्यात आली नाही. छोट्या-छोट्या खेड्यांचा विकास होत असताना पारशिवनी शहराची विकासाची गती का थांबली आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे 

या शहरातील अनेक भागांत झालेल्या खोदकामांमध्ये आजवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आढळल्या आहेत. या मूर्ती पुरातत्त्व विभागाने नागपूर येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. काही मूर्ती स्थानिक त्र्यंबकेश्‍वर देवस्थान येथेही पाहायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहराला विशेष महत्त्व आहे, याचे कारण या शहराच्या सभोवताल असलेली पर्यटनस्थळे. शहरापासून जवळच प्रसिद्ध पेंच धरण, पेंच व्याघ्र प्रकल्प, कुंवारा भिवसन, घोगरा महादेव अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तरीही हे शहर विकासापासून कोसो दूर आहे. 

शहरात उद्यान तयार करण्यात नगरपंचायत कमकुवत ठरली आहे. अनेक प्रभागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शहरातील गांधी चौक, पेंच रोड ही स्थळे वर्दळीच्या ठिकाणी असून येथील अतिक्रमण नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी नगरपंचायतने मात्र व्यवस्था केली नसल्याने वाहचालकांना त्रास होतो. अनेक ले-आउटमध्ये आजही उद्यानासाठी भूखंड रिकामे पडून आहेत. अनेकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. शिवाजी चौकात सौंदर्यीकरण करण्यासाठी जागा असूनही सौंदर्यीकरण झाले नाही.

स्थानिक आमदारांनी पारशिवनी शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले असल्याचे शहरात होर्डिंग लागले आहे. तो निधी केव्हा येईल आणि केव्हा शहराच्या विकासास हातभार लागेल याची प्रतीक्षाच आहे. शहरात मात्र पाहिजे त्या प्रमाणात विकासाची कामे झाली असे आजतरी म्हणता येत नाही. शहराच्या विकासकामांसाठी खासदार निधी मिळाल्यास शहराचे रुपडे पालटू शकते; परंतु तो निधी मिळणार कधी आणि शहराचा विकास होणार कधी याची प्रतीक्षाच करावी लागणार. 


साडेनऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, रस्ते अनुदानातील नगर उद्यान योजना, दलितोत्तर विकास निधी, दलित वस्ती विकासनिधी, पायाभूत सुविधा योजनेचा निधी, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतचा विकास निधी तसेच जिल्हा नियोजन समितीचा आतापर्यंत एकही पैसा नगरपंचायतला विकासकामांसाठी मिळाला नाही. क्रीडा विभागातूनही शहरातील क्रीडांगणे, व्यायामशाळा यांसाठी निधी आला नाही. घरकुल योजनेच्या द्वितीय टप्पाचा निधी अद्याप बाकी आहे. १४ व्या वित्तीय आयोगातर्फे निधी मिळाला नाही. स्थानिक नगरपंचायतला कुठल्याच मार्गाने पैसा येत नसेल तर शहराचा विकास होणार कसा? 
- सागर सायरे, 
सभापती, बांधकाम समिती नगरपंचायत कार्यालय पारशिवनी. 

 
विकास कामांसाठी पैसा येतो तर त्यात काही ना काही कृत्रिम अडचणी निर्माण करण्यात येतात. संत तुकाराम सभागृह बाजार चौक ते जुन्या बसस्थानकापर्यंत मोठा नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार होता. त्यासाठी नगरपंचायतला निधीही प्राप्त होऊन अनेक वर्षे लोटली. या कार्यात अडचणी निर्माण करून विकासकामात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे शहरात विकासकामे थांबलेली आहेत. 
- टिकाराम परतेती, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ३, पारशिवनी.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.