नागपूर ः केंद्र सरकारने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली. या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दीची शक्यता बघता सहाही मतदार संघात प्रत्येकी एक लसीकरण केंद्र २४ तास सुरू करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज सभागृहात प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे अद्याप ५० टक्के सफाई कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले नसल्याची बाब लक्षात घेता महापौरांंनी त्यांनी येत्या काही दिवसांत लसीकरण न केल्यास त्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले.
कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिकेच्या तयारीबाबत ऑनलाईन सभेत प्रवीण दटके यांनी स्थगनद्वारे चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शहरातील लसीकरण करणारे नागरिक, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवक, ६० वर्षांवरील नागरिक, ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांची माहिती दिली.
शहरातील लसीकरण केंद्र, चाचणी केंद्राची आकडेवारीही त्यांनी सांगितले. महापालिकेत ७ हजार ४७१ सफाई कर्मचारी असून यातील ३ हजार ८५८ सफाई कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे त्यांनी सांंगितले. त्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांनी याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांना लस बंधनकारक करा, जे लस घेणार नाही, त्यांच्या वेतनात कपात करण्याचे परिपत्रक काढा, असे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांंनी यावेळी मागील काळात बाधितांची संख्या कमी झाल्याने सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली. मात्र, आता प्रशासन तयारी करित असल्याचे सांगितले. सध्या पाचपावली, व्हीएनआयटी व आमदार निवासात कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येथे विलगीकरणातील नागरिकांना जेवण दिले जात असून गंभीर झाल्यास रुग्णाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत असल्याचे त्यांंनी सांगितले.
यावेळी दटके यांनी १ एप्रिलपासून सहा मतदार संघात प्रत्येकी एक, असे सहा केंद्र २४ तास सुरू करण्याची सूचना केली. महापौर दयाशंकर तिवारी यांंनी दटकेंच्या सूचनेवरून प्रशासनाला निर्देश दिले. आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही महापौरांनी प्रशासनाला केली. वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशन वाढवा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील चाचणी केंद्र परिसरातील समाजभवनात हलवून तिथे लसीकरण सुरू करावे, असेही निर्देश महापौरांनी दिले.
४० टक्के नागरिकांच्या चाचण्या
शहरात लोकसंख्येच्या तुलनेत ४० टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. याशिवाय पाचपावली कोव्हीड केअर सेंटरमध्ये १७०, व्हीएनआयटीमध्ये ३९ तर आमदार निवासात सध्या ६७ बाधित विलगीकरणात असल्याचे ते म्हणाले. येत्या काही दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.