नागपूर : उपराजधानीत कोरोना विषाणूची संख्या वाढत असली तरी, अनेक वर्षापासून विदर्भात असलेले 'कुपोषणा' चे संकट मात्र या काळात अधिक गडद झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सगळेच बंद असल्याने, मोल मजुरी करणाऱ्यांसह सर्वसामान्यांना जिवन जगने कठीन झाले आहे. याकाळात दोन वेळेचे अन्नही धड पोटात जात नसल्याने, विदर्भातील कुपोषणाची भिषण समस्या अधिकच गडद झाली आहे.
कोरोनाच्या आपतकालीन परिस्थितीतही या समस्येशी लढतांना अतितीव्र व तीव्र कुपोषीत बालकांचा शोध घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने "ग्रोथ मॉनिटरिंग' सुरू केले आहे. नव्या प्रणालीत एका अंगणवाडी केंद्रात दिवसभरात पाच मुलांची तपासणी होईल. गरोदर व स्तनदा मातांनाही आरोग्याची माहिती दिली जाणार आहे.
कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस) मध्ये त्यांची नोंद करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 2423 तर शहरी भागामध्ये 983 अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यात बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना पूरक पोषण आहार दिला जात आहे. याशिवाय वेळोवेळी लसीकरण देखील केले जाते.
रोज पाच बालकांची तपासणी
कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करून सर्व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या होत्या. या काळामध्ये "ग्रोथ मॉनिटरिंग'चे काम बंद असल्यामुळे अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीत अंगणवाडीतील तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी "होम ग्राम बाल विकास केंद्र' सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने अंगणवाडी केंद्रातील बालकांचे "ग्रोथ मॉनिटरिंग' सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये दिवसभरातून पाच बालकांचे उंची व वजन घेऊन त्यांची नोंद घेतली जाईल.
सर्दी, ताप असणाऱ्यांना वगळले
अंगणवाडी केंद्रात रोज गरोदर व स्तनदा मातांना आरोग्यविषयक माहिती दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविका यांनी नियमित स्वरुपात गृहभेटी द्याव्यात तसेच गृहभेटी देताना अतितीव्र कुपोषित बालके (सॅम), गरोधर माता यांना प्राधान्याने भेटी देण्यात द्यायच्या आहेत. या संदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने आवश्यक त्या सूचना दिल्या असून रेड झोन मधील बालकांची वजन व उंची घेतली जाऊ नये. ज्या लाभार्थींना सर्दी, खोकला व ताप, अशी लक्षणे असतील त्यांना अंगणवाडी केंद्रात बोलावण्यात येऊ नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य
विदर्भातील कुपोषण दुर करण्यासाठी विभाग सतत प्रयत्नशील असते. लॉकडाऊन काळात अंगणवाड्या बंद असल्या तरी, अंगणवाडीसेविका काम करीत होत्या. बालकांना पोषण आहार वाटप आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सतत सुरूच होते. ग्रोथ मॉनिटरींग सिस्टीम द्वारे रोज पाच बालकांचे वजन, उंची घेऊन तिव्र व अतितिव्र कुपोषीत बालकांचा शोध घेतला जाणार आहे.
- भागवत तांबे,
महिला व बाल विकास अधिकारी, जि. प. नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.