कोरोना काळात लग्नसमारंभात जमली मंडळी आणि झाला एकाचा मृत्यू

One dies in wedding brawl Nagpur crime news
One dies in wedding brawl Nagpur crime news
Updated on

भिवापूर (जि. नागपूर) : लग्न समारंभ आटोपल्यानंतर वर व वधू पक्षाकडील मंडळीत क्षुल्लक गोष्टीवरून वाद उद्भवला. नंतर या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या मारहाणीत वर पक्षाकडील एकाला गंभीर मार बसला. त्याला उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारी चार वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाहमी येथे घडली. अश्विन नरेश टेंभरे (वय ३५, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे.

पाहमी येथील पंजाब पिल्लेवान यांच्या मुलीचे लग्न नागपूरच्या डिफेंस परिसरात राहणाऱ्या मुलाशी ठरले होते. रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपला. जेवणावळी सुरू असताना दोन गटात अचानक वाद निर्माण झाला. हा वाद वाढत गेला. गावातील काही सुज्ञ मंडळींनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरदेवाकडील वाद घालणारे हे दारू ढोसून असल्याने त्यांच्यावर समजावण्याचा काहीच परिणाम झाला नाही. अशातच वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही पक्षाकडील मंडळींपैकी काहींना किरकोळ तर काहींना जबर मार बसला.

वाद निर्माण करून तो वाढविण्यात अश्विन टेंभरे याचा मोठा हात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शिंनी दिली. त्याला गावकऱ्यांनी समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, अधिकच दारू प्यालेला असल्याने समजावण्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. शेवटी त्याला कसेतरी नवरदेवाच्या वाहनात बसवून घटनास्थळावरून नेण्यात आले. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने त्याला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून नागपूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.

सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घटनेची सूचना भिवापूर पोलिसांना मिळाली. एपीआई भस्मे यांनी लगेच पाहमी येथे धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. मारहाणीत जखमी झालेले वामन डहाके (वय ५४) व त्यांचा मुलगा समीर डहाके (वय २२, दोघेही रा. पाहमी) यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कुणाविरुद्धही गुन्हा नोंदविलेला नव्हता. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.