नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मेडिकल कोविड समिती तयार केली. या समितीने ४०० खाटांसाठी १९ कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, मनुष्यबळाचे काय? सध्या मेडिकलमध्ये १२ पोर्टेबल एक्स-रे मशीन आहेत. ४०० खाटांसाठी आणखी ५ पोर्टेबल एक्स-रे मशीन वाढविण्यात आले आहेत. त्या तुलनेत मेडिकलमध्ये अवघे १० ते १२ एक्स-रे तंत्रज्ञ आहेत. १७ पोर्टेबल एक्स-रे मशीनवर १० ते १२ एक्स रे तंत्रज्ञ २४ तास कसे काम करणार? यासंदर्भात प्रशासनाने चुप्पी साधली आहे.
मेडिकलमध्ये निकषानुसार, ५०० खाटांसाठी आवश्यक एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. त्यात ४०० खाटा वाढवून १००० खाटांचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध १० ते १२ तंत्रज्ञ १२ तास सेवा देत आहेत. ४०० खाटा वाढविल्यांनतर एक्स-रे मशीनवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा जीव घेण्याचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा येथे पसरली आहे. नुकतेच मेडिकल प्रशासनाने कोविड समिती गठित केली. यंत्रसामग्री, औषधे, मनुष्यबळ आदींचा विस्तृत अहवाल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे सादर केला आहे. यात २०० निवासी डॉक्टर, २० पथक प्रमुख , १२ विशेषज्ञ, २०० परिचारिका, १२२ वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे, असे अहवालात नमूद आहे. परंतु, एक्स-रे तंत्रज्ञ अर्थात पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा समावेश या अहवालात नाही. लगेच एक्स-रे तंत्रज्ञ आणणार कुठून? हा प्रश्न उभा ठाकला आहे.
आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मेडिकलला नुकतीच भेट दिली. या भेटीत १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध आहेत. यावर आक्षेपही घेण्यात आला. कोविड वॉर्डातील रुग्णसेवेचा आढावा घेत ४०० खाटांचे एचडीयू तयार करण्यात यावे, अशी सूचना मंत्रिमहोदयांनी केली. मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १० वॉर्ड यासाठी रिकामे करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निकष हे सांगतात -
२५० एमबीबीएस विद्यार्थीसंख्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ एक्स-रे तंत्रज्ञ आणि ४ सहाय्यकांची आवश्यकता असते, तर रुग्णालय विभागात ५०० खाटांसाठी ९ एक्स-रे तंत्रज्ञ आणि ५ सहायकांची गरज आहे. मेडिकलमध्ये १७०० खाटा आहेत. येथे ३० एक्स-रे तंज्त्रज्ञांची गरज आहे. १७ सहाय्यकांची गरज आहे. मात्र, सध्या स्थितीत मेडिकलमध्ये १० ते १२ एक्स-रे तंत्रज्ञ कार्यरत आहेत. सध्या कोविड वॉर्डात पोर्टेबल एक्स-रे यंत्र लावण्यात आले. एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात कॉलनुसार हे एक्स-रे तंत्रज्ञ दिवसभर-रात्रभर ये-जा करतात.
अल्प मनुष्यबळ असताना एक्स-रे तंत्रज्ञ सेवा देत आहेत. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त काम झाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. एक्स-रे काढणे आमचे काम आहे, ते करतो. सध्या वाढीव ४०० खाटांसाठी एक्स-रे तंत्रज्ञांच्या जागा भरण्यात याव्यात, असे क्ष-किरण तंत्रज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य)चे सचिव प्रकास गढे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.