नागपूर : कोरोनाच्या लाटेत कुणी दिवसरात्र मेहनत करून रुग्णांचे प्राण वाचवित आहेत, तर त्याचवेळी काही महाभाग गोरगरिब रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळून आपले खिसे भरत आहेत. या कामात अनेक खासगी रुग्णालये आघाडीवर आहेत. ही रुग्णालये उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांना लाखोंची आगाऊ रक्कम रोख स्वरूपात जमा करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी येताहेत. त्यांच्या मनमानीकडे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे.
यासंदर्भात आलेले वाईट अनुभव दैनिक 'सकाळ'शी शेअर करताना सहकारनगर येथील ज्येष्ठ नागरिक हुकूमचंद मिश्रिकोटकर म्हणाले, माझी पत्नी कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर मी तिला देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. रुग्णालयाकडून रोख एक लाख रुपये आगाऊ भरण्यास सांगितले. धनादेश किंवा ऑनलाइन पेमेंट चालणार नाही.
ताबडतोब पैसे भरा अन्यथा दुसरा पेशंट तयार आहे, असे फर्मान सोडण्यात आले. माझे ज्या बँकेत खाते आहे, ती कोरोना रुग्ण आढळल्याने बंद होती. अशा परिस्थितीत वयाच्या ८४ व्या वर्षी मी रुग्णाकडे लक्ष द्यायचे की पैसे काढण्यासाठी वणवण भटकायचे, याचा विचार कुणीच केला नाही. टेलिफोन एक्सचेंज चौकातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्येही माझ्या एका नातेवाईकाकडून उपचाराच्या नावाखाली आतापर्यंत सहा लाख उकळले. एकाच पीपीई किटचा चार्ज अनेकांकडून वसूल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांच्या नातेवाईकांच्या लुटीचे चित्र सध्या शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे. एकवेळ श्रीमंत व्यक्ती उपचाराचा खर्च करतील, गोरगरिबांनी काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या मनमानीकडे स्थानिक प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात मी निवासी जिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना फोन केला असता, त्यांनी पाहतो एवढेच सांगितले. मनपा किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कंट्रोल रूमवर संपर्क साधला असता नीट उत्तर मिळत नाही. हेल्पलाईनकडूनही अपेक्षित माहिती व मदत मिळत नसल्याचे मिश्रिकोटकर म्हणाले. मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांच्या या मनमानीला आवर घालावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.