नागपूर : पोटाची भूक भागवण्यासाठी अंगावर मखमली कपडे चढवून चेहऱ्याला रंग फासून शरीर विकताना आम्हाला होणाऱ्या यातना आणि वेदनांचा हिशोब कोणी मांडत नाही. आमची लेकरं समाजासाठी अनौरस. आम्हीही ९ महिनेच लेकरांले पोटात ठेवलं. त्यांच्यासाठी आमचाही जीव तुटतो, मात्र पोलिसांनी कठडे लावले. बाहेर निघण्यास मनाई, खाकी वर्दीच्या दहशतीने आमची लेकरं घाबरली. भीतीपोटी लेकरांसाठी दूध आणायला जाण्याची हिंमत उरली नाही, भेदरलेल्या हरिणींच्या कळपासारखी आमची गत झाल्याची भावना त्या व्यक्त करीत होत्या. रात्र उलटून गेल्यानंतर लेकराले दूध नाही मिळालं, तर बोट चुरपून झोपवलं साहेब...ती माय सांगत होती... अशी एक नव्हे... अनेक चिमुकली दुधावरची मुलं येथे आहेत. आजारामुळे अंगावर पाजनं शक्य नसल्याने नसल्याने बाहेरचे दूध आणतात.
बारा दिवसांपूर्वी पोलिसांची धाड पडली. खाकी वर्दीच्या दहशतीने गंगाजमनातील देहविक्रीचा व्यवसाय थांबला. या महिलांच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला गेला. या वस्तीच्या विरोधात लकडगंज पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रारी आहेत. सामान्य नागरिकांना या वस्तीमुळे त्रास सहन करावा लागतो, यामुळे दोनशे पोलिसांनी धाड टाकली.
बुधवार ११ ऑगस्ट रोजी या महिलांची रोजीरोटी हिसकावली. आजही हजारो महिलां खाकीवर्दीच्या नजरकैदेत आहेत. एकिकडे खाकीवर्दीकडून झालेल्या कारवाईवर आनंद व्यक्त होत आहे, मात्र दुसरीकडे वारांगणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. रात्री देहाचे लचके तोडून मिळणाऱ्या कमाईवर उद्याचा दिवस जगणाऱ्या वारांगनानी पोट कसं भरायंच, हा नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्करतर्फे करण्यात आला आहे.
कोरोनापेक्षा भयावह चित्र
कोरोनाकाळात जगण्याची धडपड सुरू होती. लॉकडाउन सुरू झाले. जगणे कठीण झाले, त्यावेळी मायबाप उद्धव ठाकरे यांचे सरकार धावून आले. आर्थिक मदत केली. आता पोटपाण्याचा व्यवसाय सुरू झाला आणि अचानक खाकी वर्दीने घाव घातला. हजारावर महिलांच्या पोटाचा सातबाराच विसकटला आहे. येथील शरीर विक्रय करणाऱ्या प्रत्येक भगिनींची कथा आणि व्यथा वेगळी आहे. त्यांचा जगण्याचा संघर्ष इतर कष्टकऱ्यांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. परिस्थितीचे फासे असे विचित्र की, त्यांना या व्यवसायात पडावेच लागले आहे. मान नाही, सन्मान नाही. उलट लोकांच्या विखारी नजरांना नजर देत देत आयुष्य कसेबसे चालू आहे. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर सहा दिवसांपासून दोन वर्षांचं बाळ आजारी आहे, त्याला दवाखान्यात नेण्याची भीती वाटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.