- अखिलेश गणवीर
नागपूर : कमकुवत झालेल्या भिंती, सतत स्लॅब कोसळण्याचा धोका, छतातून गळणारे पाणी आणि ढासळणारी छपरे यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वसाहती धोकादायक बनल्या आहेत.
त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची कुटूंब जीव मुठीत घेऊन दहशतीच्या छायेत जगत आहेत. महानगरपालिकेने इमारत धोकादायक म्हणून कळविल्याची माहिती पुढे आली होती. पण त्यानंतरही काहीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गणेशपेठ चौकातून मॉडेल मीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही एसटी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. चार मजल्यांच्या सहा इमारती असून प्रत्येक इमारतीत आठ गाळे आहेत. रविवारी दिवसभर शहरात पाऊस होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ‘सकाळ’च्या टीमने या वसाहतीची पाहणी केली असता महामंडळाच्या क्वार्टरची भीषण वास्तविकता पुढे आली.
मुख्य गेटच्या पुढेच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून होते. पाणी वाहून जाण्यासाठी जागा नव्हती. अतिशय जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींची विदारक स्थिती दिसत होती. काही कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, इमारत जवळपास पन्नास ते साठ वर्षापूर्वी बांधलेली आहे.
नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. छतावरून पाणी पाझरते. भिंतीला तडे गेले आहेत. खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. त्यातून घरात पाणी शिरते. खिडकींचे लाकडी पल्लेसुद्धा निघाले आहेत.
अनेक तक्रारीनंतर केवळ इलेक्ट्रिक वायरिंग बदलविण्यात आल्या आहेत. मनपाच्या सूचनेमुळे केवळ दाखविण्यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूस छपाई करण्यात आली. आतून मात्र अवस्था अत्यंत वाईट आहे.
याकडे लक्ष न दिल्यास येत्या काळात इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथे राहणारे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय दहशतीच्या छायेत आहेत. सर्वात जास्त पावसाळ्यात त्यांना भीती आहे.
येथे राहण्याची मानसिकता नाही. मात्र, तुटपुंज्या पगारावर दुसरीकडे भाड्याने खोली घेऊन राहण्याचा खर्च त्यांना झेपत नाही. त्यामुळे मजबुरीने येथे राहावे, लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
बाहेरील लोकांनी बनविला दारूचा अड्डा
इमारत सरकारी आहे. असे समजून बाजूच्या वस्तीत आणि इतर ठिकाणी राहणारे असामाजिक तत्त्वाचे लोक येथे येतात. पार्किंगच्या शटर खाली जुगार खेळतात. रात्री दारू पितात. जोरजोराने ओरडतात. महिलांच्या समोरच हा सर्व प्रकार घडतो.
बहुतांशवेळा कर्मचाऱ्यांनी हटकल असता त्यांना शिवीगाळ करतात. पोलिसांत तक्रार केली म्हणून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाने येथे चोवीस तास सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सुद्धा कर्मचाऱ्यांची आहे.
घाणीमुळे आरोग्याला धोका
पावसाळ्यात इमारतीसह परिसरात ठिकठिकाणी पाणी साचते. कचरा नियमितपणे उचलला जात नाही. मोकाट गायी व म्हशींचा वावर आहे. तसेच परिसराची नियमितपणे साफसफाई होत नाही. सर्वत्र घाण असते. पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार वाढत असल्याचेही येथील रहिवाशांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.