नागपूर : पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील रिपिटर्स कर्मचारी काढून नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेतही व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. वारंवार वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांना संधी मिळत नसल्याची खंत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेत १० झोन तयार करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेत ७८० पोलिस अंमलदार आणि जवळपास ६० अधिकारी आहेत. ‘नगदी कमाई’ नावाने वाहतूक शाखेला ओळखले जाते. त्यामुळे वाहतूक शाखेत नियुक्ती मिळविण्यासाठी अनेक पोलिस कर्मचारी ‘सेटिंग’ लावतात. मात्र, वाहतूक शाखेत एक दबाव गट तयार झाला असून, तेच कर्मचारी बदली झाल्यानंतरही काही कालावधीतच वाहतूक शाखेत परत येतात, अशी चर्चा आहे.
या बाबींकडे पोलिस आयुक्तांचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची चांदी आहे. जवळपास सर्वच झोनमध्ये रिपीटर्स असून, सीताबर्डी आणि कामठी झोन फेव्हरेट आहे. कर्मचाऱ्यांचे हित साधणाऱ्या पोलिस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील रिपीटर्सकडे लक्ष द्यावे, जेणेकरून वाहतूक शाखेची डागाळलेली प्रतिमा नीट होईल, अशी विभागात चर्चा आहे. वाहतूक शाखेतील अनेक कर्मचारी एकाच झोनमध्ये आणि एकाच जागेवर काम करीत असून अन्य कर्मचाऱ्यांना राबवून घेतल्याचे बोलले जाते.
वाहतूक शाखेत रिक्षा स्कॉड कार्यरत असून एका पथकात चार कर्मचारी तैनात आहेत. सायकल रिक्षावर १०२, ११७ ची कारवाई करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे पथक भलत्याच कामात व्यस्त असते. फुटपाथवरील दुकानदारांना हाताशी धरून ‘प्रेमाने’ वसुली करण्याचे काम हे पथक करीत आहेत. यामध्ये कॉटन मार्केट आणि सीताबर्डी झोन ‘हॉट’ आहे.
अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जॅमर पथक आहे. प्रत्येक वाहनात खाकी पॅंट घालून दोन युवक बसलेले असतात. त्यांच्या हातात शासकीय उपकरणसुद्धा असतात. जॅमर लावल्यानंतर त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम खासगी युवक करीत असल्याची चर्चा आहे. त्या युवकांचे वेतन कुठून देण्यात येते, हा मोठा प्रश्न आहे.
पोलिस आयुक्तांना अहवाल पाठविण्यात येईल
नुकतीच आम्ही ८१ जणांची बदली केली आहे. आणखी काही रिपीटर्स वाहतूक विभागात असून त्यांनी यादी तयार करणे सुरू आहे. यादी तयार होताच पोलिस आयुक्तांना अहवाल पाठविण्यात येईल.
- सारंग आवाड,
पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.