Nagpur : बाळंत मातेच्या आईवर डॉक्टरने उगारला हात, संतापजनक प्रकार

Nagpur : नागपूर मेडिकलच्या वॉर्ड २७ मध्ये निवासी डॉक्टरने बाळंत मातेच्या आईवर हात उगारल्याची घटना घडली. पेशंट राईट फोरमने या प्रकरणाची चौकशी करून तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
Crime nagpur
CrimeEsakal
Updated on

नागपूर : साहेब मुलीच्या हाताला लावलेले दोन्ही सलाईन संपले. जरा बघा... लेकरू तळमळतंय... दार उघडा, जरा पाहून घ्या... सिस्टरही झोपल्या आहेत... दरवाजा वाजवून थकले... पण त्याही उठायला तयार नाहीत हो, जरा लेकराला पहा....कानठळ्या बनविणारा हा आक्रोश होता, एका बाळंत मातेच्या आईचा...

तिच्या आवाजाने झोपमोड झाल्याने निवासी डॉक्टरचा पारा चढला आणि त्याने चक्क बाळंत मातेच्या अंगावर हात उचलल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला.

ही संतापजनक घटना मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक २७ मध्ये घडली. डॉ. प्रदीप असे बाळंत मातेच्या अंगावर हात उचलणाऱ्या संतापी डॉक्टरचे नाव असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात निवासी डॉक्टरांची संघटना मात्र मूग गिळून बसल्याने आणखी रोष व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेली निकिता सतीश ढवळे या गरोदर मातेच्या आईसोबत ही घटना घडली.

निकिता ही सुरुवातीला अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराला आली होती. कावीळ असल्याने बाळंतपणासाठी तिला अकोला मेडिकल कॉलेजने २२ सप्टेंबरला मेडिकलला रेफर करून पाठविले. रात्री निकिताने एका मुलाला जन्म दिला. मेडिकलच्या स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाने दुसऱ्या दिवशी तिला वॉर्ड क्रमांक २७ मध्ये शिफ्ट केले. गेल्या चार दिवसांपासून निकिता आपल्या बाळाला स्तनपान करू शकलेली नाही.

झोप मोड झाल्याने संताप

निकिताच्या दोन्ही हातांना लावलेले सलाईन रात्री दोन वाजता संपल्याने निकिताच्या आईने सुरुवातीला परिचारिकांना उठविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मातेने निवासी डॉक्टर झोपलेल्या कक्षाकडे धाव घेतली. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर झोपमोड झाल्याने आतून प्रदीप नावाचा निवासी डॉक्टर निकिताच्या आईच्या अंगावर धावला आणि त्याने चक्क त्यांच्या अंगावर हात उचलला. झालेला अपमान गिळत मातेने लेकिकडे आधी बघा हो...असा टाहो फोडल्याने अखेर निकिताच्या हाताला लावलेले सलाईन बाजूला केले.

झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच पेशंट राईट फोरमचे पदाधिकाऱ्यांनी निकिताच्या आईकडून सत्यता जाणून घेतली. यासंदर्भात प्रदीप नावाच्या निवासी डॉक्टरची अधिष्ठातांकडे लेखी तक्रार करणार आहे.

- राज खंडारे, अध्यक्ष, पेशंट राईट फोरम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.