नागपूर: महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. गहू, हरभरा डाळ आणि खाद्यतेलासह भाजीचे भावही सतत वाढत आहे. त्यामुळे हॉटेल तर दूरच, पण घरचे जेवणही महाग झाले, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
सणासुदीच्या तोंडावर गहू, खाद्य तेल, हरभरा डाळीच्या पाठोपाठ घरासाठी लागणारा भाजीपाला, कांदा आणि लसणाचे भावही महिनाभरात १० ते २० टक्के वाढ झाल्याने सर्वांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ऑगस्टच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च वाढला आहे. सणासुदीत हरभरा डाळ, गहू, खाद्य तेल, रवा, गव्हाचे पिठ, मैद्याला अधिक मागणी असते. घरोघरी गोडधोड तयार केले जाते. यंदा मात्र, गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंतच्या सर्वच सणांवर महागाईचे सावट दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडणार आहे.