Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवासाठी नियमावलीअभावी मंडळे संभ्रमात

वेळेवर अटी लादल्यास काय करायचे? महापालिका, पोलिस प्रशासन मात्र सुस्त
safty rules for Ganeshotsav Mandals Municipal Police Administration terms nagpur
safty rules for Ganeshotsav Mandals Municipal Police Administration terms nagpurSakal
Updated on

नागपूर : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसावर आला असून शहरातील विविध मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. परंतु ऐनवेळी महापालिका तसेच पोलिस प्रशासन अटी लादून उत्साहात विरजन पडण्याची शक्यता आहे. महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून अद्यापही मंडप, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, रोषणाई, विद्युत जोडणी आदीबाबत कुठलीही नियमावली जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांत संभ्रम असून ऐनवेळी अटी लादण्याची भीतीही सतावत आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध उठवले. परंतु स्थानिक प्रशासन म्हणून महापालिकेकडून सार्वजनिक मंडळासाठी नियमावली जाहीर करणे अपेक्षित आहे.या मंडळाकडून अनेकदा मोठे मंडप उभे केले जाते. ते करताना घ्यायची दक्षता, रस्त्यांवर खड्डे करणे, मंडपाचा आकार, उंची, रोषणाईसाठी वैध वीज जोडणी, जनरेटरचा वापर, आगीपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना, मूर्तीची उंची याबाबत महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वीच नियमावली जाहीर करणे अपेक्षित आहे.

किंबहुना दरवर्षी ही नियमावली जाहीर केली जाते. मागील वर्षीही कोरोनाची साथ असली तरी मूर्तीची उंची, गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत नियमावली जाहीर केली होती. एवढेच नव्हे तर पोलिसांकडून ध्वनिक्षेपकांचा आवाज किती डेसिबल असावा, रस्त्यांवर मंडप उभारून वाहतूक कोंडी होऊ नये, रस्त्यावर कमानी उभारल्यास त्याची उंची किती असावी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणेश विसर्जन मिरवणूक याबाबत नियमावली जाहीर करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव आठ दिवसांवर आला असून महापालिका व पोलिस विभागाकडून मंडळांसाठी अद्यापही कुठलीही नियमावली जाहीर करण्यात आली नाही.

त्यामुळे गणेशोत्सव मंडळांवर सध्यातरी कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव हर्षोउल्हासात तसेच कुठल्याही दुर्घटनेशिवाय साजरा करण्यासाठी काही नियमावली आवश्यक असल्याचे मत शहरातील नागरिकही व्यक्त करीत आहेत. गणेश मंडळांकडून उत्साहात तयारी केली जात आहे. संपूर्ण तयारी केल्यानंतर महापालिका व पोलिसांकडून नियम लादल्यास गणेशोत्सव मंडळांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे केलेल्या सर्व तयारीत विघ्न येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण तयारीपूर्वीच नियमावली जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे.

उंच गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी देणार ताकीद

राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीचेही निर्बंध हटविले. परंतु शहरातील सर्वच तलावांची कामे सुरू आहेत. त्यामुळे चार फुटांपेक्षा उंच मूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न उभा राहणार आहे. शहरात चार फुटापेक्षा उंच मूर्तीची स्थापना एकूण किती मंडळांनी केली, याबाबत महापालिकेकडून १ सप्टेंबरला पाहणी केली जाणार असून मंडळांना विसर्जनाची शहराबाहेर सोय करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे मनपातील एका अधिकाऱ्याने नमुद केले.

मुंबई, पुणे महापालिकेची नियमावलीत आघाडी

मुंबई, पुणे महापालिकेने गणेशोत्सव मंडळासाठी नियमावली जाहीर केली. या शहरांत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. परंतु नागपुरातही दरवर्षी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या एकूण दोन लाखांवर गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदा हजारांवर सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे. मुंबई, पुणेप्रमाणे उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात नियमावली गरज नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळची भूमिका

शहरातील अनेक मंडळांनी सजावट, मंडप, रोषणाईसाठी डेकोरेशन व्यवसायिकांना ऑॅर्डर दिले आहेत. काहींनी मंडपासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागाही निश्चित केल्या. गणेश मंडळे कामाला लागण्यापूर्वीच महापालिकेने नियमावली जाहीर करण्याची गरज होती. त्यामुळे अद्यापही वेळ गेली नसून महापालिकेने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमावली जाहीर केली तर नागपूरकरांनाही गणेशोत्सव खऱ्या अर्थाने हर्षोल्हासात साजरा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.