विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवार १५ जून २०२४ रोजी सुरू होत आहेत.
अमरावती : दरवर्षी नवीन सत्रात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश (School Uniform) वितरित केले जायचे. सदर योजनेचे कार्यान्वयन व्यवस्थित सुरू असताना यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या कार्यान्वयनात विनाकारण बदल केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य शाळांतील विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
२०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद (Zilla Parishad School), नगर पालिका, महानगर पालिकांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित गणवेशाचा एक संच आणि स्काऊट गाईड गणवेशाचा एक संच पुरविण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गत करण्यात आलेल्या आहेत. गणवेश कापडाचे मायक्रो कटिंग करून आवश्यक संख्येने पुरवठा करण्याचे कंत्राट ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आले आहे. संबंधित पुरवठादाराने कापड बॉक्स प्रत्येक गट शिक्षणाधिकारी यांना पुरवायचे आहे.
त्यानंतर लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचतगटाद्वारे गणवेशाची शिलाई करून त्यांच्याकडून शाळांपर्यंत शिवलेल्या गणवेशाचा पुरवठा करायचा आहे. पण आजपर्यंतही कार्यवाही झाली नाही. ती कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी राज्य प्रकल्प संचालक मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, असे शिक्षक समितीचे (Teachers Committee) राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवार १५ जून २०२४ रोजी सुरू होत आहेत. विदर्भातील शाळा १ जुलै २०२४ पासून सुरू होत असताना अद्यापपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एकाही शाळेत जाऊन शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी १० जून २०२४ पर्यंत लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नाहीत. अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील? तसेच अंदाजे मापे गृहीत धरून गणवेश शिलाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे.
गणवेश योजनेच्या संबंधाने कार्यान्वयनात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासह सर्व विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जून २०२४ आणि विदर्भात १ जुलै २०२४ पूर्वी वितरित होण्याची कार्यवाही करावी. तसेच स्काऊट गाईडचे गणवेशसुद्धा नियमित गणवेशाप्रमाणे शिलाई करूनच शाळांना मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित, महादेव माळवदकर यांनी केली, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी राजेश सावरकर यांनी सांगितले.
स्काऊट गाईडचा गणवेश शिवून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अर्थात कार्यान्वयन करणाऱ्या मुख्याध्यापकांकडे देण्यात येऊ नये.
-राजेश सावरकर शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.