Nagpur News : चांगल्या कामांमुळे पोटदुखी, भांडणे लावण्याचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे

...तर परिणाम भोगावे लागतील; माजी मंत्री बच्चू कडू यांचा इशारा
chandrashekhar bawankule bacchu kadu
chandrashekhar bawankule bacchu kadusakal
Updated on

नागपूर : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे चांगले काम करीत असल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे आपसांत भांडणे लावण्यासाठी विरोधकांतर्फे वादग्रस्त विधाने केली जात आहेत,’’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

‘‘बच्चू कडू जे काही बोलले, त्याबद्दल स्पष्टीकरण देणे योग्य वाटत नाही. आम्ही कोणाचा गेम करत नाही. ती आमची सवय आणि आमचे रक्तही नाही. अजित पवार यांनी राज्य व देशाच्या विकासासाठी भाजपला समर्थन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी पवार या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. शिंदेंच्या नेतृत्वात अजित पवार राज्यभर फिरत आहेत. आज नगरमध्ये ‘शासन आपल्या दारी’द्वारे हजारो लोकांना फायदा मिळत आहे,’’ असेही बावनकुळे म्हणाले.

शरद पवारही बरोबर येतील!

अजित पवार आणि शरद पवार यांनी त्यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. एका कुटुंबातील दोन सदस्य भेटले तर त्यास राजकीय समजू नये. मात्र, एक काळ असा येईल की मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जातो आहे, हे पाहून शरद पवारही एकेदिवशी मोदींचे नेतृत्व मान्य करतील.

त्यांची भूमिका बदलेल, यापूर्वी कधी वाटले होते का की अजित पवार आमच्याबरोबर येतील. कधी विचार केला होता का की शिंदे आमच्याबरोबर येतील. जेव्हा महाविकास आघाडी सरकार बनले, तेव्हा आम्ही एकटेच होतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्याची वाट पाहावी लागते, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

मोदींच्या भूमिकेचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपण्यासाठी भाजपच्या एकाही नेत्याच्या कुटुंबाला उमेदवारी देणार नाही, असे म्हटले आहे. त्यावर आमदाराच्यापोटी आमदार ही भूमिका नसली पाहिजे असे सांगताना बावनकुळे यांनी जर आमदाराच्या मुलात क्षमता असेल तर उमेदवारी दिली पाहिजे, नसेल तर नाही असे सांगून मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

...तर परिणाम भोगावे लागतील; माजी मंत्री बच्चू कडू यांचा इशारा

‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले, तर भाजपला त्याचे खूप परिणाम भोगावे लागतील,’’ असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला.

‘‘शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपबरोबर आले आहेत. जेव्हा भाजपबरोबर कोणीच नव्हते तेव्हा शिंदे आले. त्यांनी मोठे धाडस केले. वर्षभरानंतर त्यांना डावलून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले तर त्याचे परिणाम वाईट होतील. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते,’’ असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हापासूनच ते मुख्यमंत्री होतील अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

मुख्यमंत्री होण्यासाठीच अजित पवार हे शरद पवार यांची मनधरणी करीत असल्याची शंका बुधवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती. वारंवार दोन्ही नेते भेटतात. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तो शरद पवार यांनीच दूर करावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.