नागपूर : वडील एका खासगी कॉलेजमध्ये चतुर्थ कर्मचारी व आई घरोघरी स्वयंपाकाचे काम करते. घरात अठरा विश्वे दारिद्र्य व आर्थिक चणचण असताना अशा परिस्थितीत आईवडिलांनी आपल्या खेळाडू मुलीला प्रोत्साहन देऊन तिच्या ‘स्पोर्ट्स करिअर’ला आकार दिला. मुलीनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला सुवर्णपदक मिळवून देत मायबापाच्या कष्टाचे चीज केले.
ही प्रेरणादायी पण तितकीच संघर्षमय कहाणी आहे नुकत्याच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळविणारी आंतरराष्ट्रीय महिला आट्यापाट्या खेळाडू श्रुती कडवची. चुनाभट्टी झोपडपट्टी परिसरातील एका छोट्याशा घरात राहणाऱ्या श्रुतीचे वडील (सुरेश कडव) धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ‘डेली वेजेस’वर काम करतात.
तर आई (अर्चना कडव) शेजाऱ्यांकडे स्वयंपाकाचे काम करून मुलाबाळांचे पालनपोषण करतात. घरात खाणारे अनेक अन कमाई मात्र तुटपुंजी. घरात आईवडिलांसह दोन बहिणी व आजी राहाते. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आईवडिलांनी श्रुतीला काहीही कमी पडू दिले नाही. मुलीला सर्व प्रकारचा सपोर्ट व प्रोत्साहन देत तिच्या स्वप्नांना बळ दिले. श्रुतीची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी नुकतीच महाराष्ट्र सरकारतर्फे २०२२-२३ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
डॉ. दीपक कवीश्वर व अमरकांत चकोले यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या २४ वर्षीय श्रुतीने देशविदेशातील अनेक ज्युनिअर व सिनियर स्तरावरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावून उपराजधानीला नावलौकिक मिळवून दिलेला आहे. तिने अलीकडेच भूतान येथे झालेल्या दक्षिण आशियाई आट्यापाट्या स्पर्धेतही तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. हँडबॉलमध्येही तिने राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
हँडबॉल ते आट्यापाट्यापर्यंतचा प्रवास
शालेय स्तरावर सुरवातीला हँडबॉल खेळणाऱ्या धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या श्रुतीने दहावीनंतर अचानक खो-खोकडे आपला मोर्चा वळविला. मात्र त्या काळात नागपुरात खो-खोच्या फारशा स्पर्धा होत नसल्याने ती आट्यापाट्यामध्ये रमली. सुदैवाने या खेळात गुरू चांगले मिळाल्याने तिने या खेळात स्वतःला झोकून देत आपली गुणवत्ता सिद्ध केली.आतापर्यंत गरिबीत दिवस काढणाऱ्या श्रुतीला पुरस्कार तर मिळाला, मात्र आता स्वतःच्या पायावर उभे राहून आईवडिलांना आर्थिक हातभार लावायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.