नागपूर : कुठलीही चूक नसताना लहानपणीच हरवलेली दृष्टी. घरची परिस्थितीही बेताची. मात्र, खचून न जाता तो शिकला, प्रथम श्रेणीत दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् आता समाजातील नकारात्मकता घालविण्यासाठी लढतोय. ही कहाणी आहे, दररोज दहा तास अभ्यास करून सनदी अधिकारी (IAS) बनण्याचा ध्यास घेतलेल्या दृष्टिहीन शुभम नंदेश्वरची.
शुभमच्या आई-वडिलांचा भाजीचा व्यवसाय असून दोन बहिणीसह एकूण पाच जणांची जबाबदारी वडिलांवर आहे. अशातच प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच शुभमवर मोठा आघात झाला. त्याच्या एका डोळ्याला काचबिंदूने ग्रासले. त्याची शस्त्रक्रिया झाली. महिन्याभरात डोळ्यात कचरा गेल्याने त्याने डोळा चोळला आणि त्याला डोळा कायमचा गमवावा लागला. दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी दुसऱ्या डोळ्याचीदेखील शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. पण, पैशांअभावी शस्त्रक्रिया उशीर झाला आणि दुर्दैवाने दुसरा डोळा देखील त्याने गमावला.
तरीही तो डगमगला नाही. या पूर्ण प्रवासात समाजातील नकारात्मकता, शिक्षण क्षेत्रात असलेल्या उणिवा त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. यामध्ये, बदल करण्याचा निश्चय करून त्याने कुठल्याही शिकवणीचा आधार न घेता यूपीएससीची तयारी सुरू केली. पुणे येथील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातूनच पदवी मिळवायची म्हणून त्याने बारावीमध्ये मेहनत घेत ८१ टक्के प्राप्त केले आणि कला शाखेतील इतिहास विषयातून पदवी पूर्ण केली. अशा होतकरू मुलांना पालक लाखो रुपये खर्च करून शिकवण्या लावतात. मात्र, शुभमने कुठल्याही शिकवणीशिवाय स्वबळावर इथवर मजल मारली आहे. परीक्षेत यश मिळावे म्हणून दिव्यांग असूनसुद्धा दररोज आठ ते दहा तास तो अभ्यास करतो.
वाद्यातील लय ओळखण्याची देणगी
लहानपणापासूनच शुभमला वाद्यांची खूप आवड आहे. मिळेल त्या वस्तूमधून ताल शोधण्याचा तो प्रयत्न करीत होता. पाचवीत असताना त्याच्या हातात ड्रम वाद्य आले आणि कुठल्याही शिकवणी शिवाय तो ते वाजवू लागला. आज शुभम ड्रमसह कोंगो, कहोन, ऑक्टोपॅड वाद्य लीलया वाजवतो. तर, तबला आणि गिटार वाजविण्याचा तो सराव करतो आहे. याशिवाय, बुद्धिबळ या खेळात सुद्धा त्याला रस असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्याने बाजीसुद्धा मारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.