उमरेड : कोळसा भरलेल्या अठरा चाकी भरधाव ट्रकने रस्त्याने जात असलेल्या गायींना जोरात धडक दिली. यात ट्रकखाली दबून १० गायी जागीच ठार, तर अंदाजे १५ गायी गंभीर जखमी झाल्यात. ही घटना रविवारी (ता.६)सकाळी दहाच्या सुमारास उमरेड-सिर्सी मार्गावरील बेसूर शिवारात घडली.
घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी काही काळ रस्ता अडवून धरला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिसअधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार अनिल राऊत, भिवापूरचे तहसीलदार डहाट यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेनंतर ट्रकचालक वाहन सोडून पळून गेला. त्याच्याविरुद्द विविध कलमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळी बेसूर येथील गुराखी चराईकरिता गायी शिवारात घेऊन जात होता. एवढ्यात उमरेडवरून गिरडच्या दिशेने भरधाव जात असलेल्या १८ चाकी ट्रकने गायीना जोरदार धडक दिली. यात १० गायी चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या. जवळपास १५ गायी जखमी झाल्याची माहिती आहे.
त्यातील काहींची स्थिती गंभीर असल्याचे समजते. उमरेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील चमुंनी घटनास्थळी जखमी गायीवर जाऊन उपचार केलेत. दरम्यान माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देत पीडित शेतकऱ्यांचे सांत्वन केले. मृत्यूमुखी पडलेल्या गायीचे प्रती गाय ४० हजार, तर जखमी गाईंप्रती २० हजार रुपये भरपाईची मागणी पीडित गायमालकांनी केली आहे.
अपघातात वाढलेली झाडे कारणीभूत
उमरेड ते गिरड सिर्सी मार्गावर (राज्य मार्ग क्र. ३२६) चारगाव गोटाडीपासून तर बेसूरपर्यंतचा भाग घनदाट जंगल व टेकडीचा आहे. शिवाय रस्त्याला अनेक धोकादायक वळणं आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची नियमित कटाई केली जात नसल्याने त्यांच्या फ़ांद्या रस्त्यावर लोंबकळतात.
त्यामुळे वाहन चालकांना समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही व अपघात घडतात. यात आतापर्यंत शेकडो जणांचे जीव गेले आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांचा बराच वावर आहे. ते नेहमी रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे सुद्धा अनेकदा अपघाताच्या घटना घडल्याच्या नोंदी आहेत. यासाठी भाष्कर येंगळे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. मात्र त्याची अद्याप दखल घेतल्या गेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.