बेला (जि. नागपूर) : तत्कालीन सावकार व किराणा व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या पुत्ररत्नाचे नाव ठेवले ‘चिंतामण’ अन् त्यांचे उभ्या आयुष्याच्या वाट्याला आली सततची चिंता. १९ व्या वर्षीच त्यांना मुख्याध्यापकपदाची नोकरी मिळाली. परंतु, त्यांची होमगार्डची सेवा संस्थेच्या पचनी पडली नाही. त्यांना सहा वर्षांतच नोकरीवरून हात धुवावे लागले. झालेल्या अन्यायासाठी चिंतामण लक्ष्मणराव डेकाटे या सभ्य व्यक्तीचा ५३ वर्षांपासून चिंताग्रस्त मनाने आजही संघर्ष सुरू आहे.
सातवी पास झाल्यानंतर तत्कालीन पीटीसी नामक प्रायमरी टीचर कोर्स पूर्ण केला. १९६२ ला त्यांना बेला येथील लोकजीवन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी नियुक्ती मिळाली. नोकरी सुरू असतानाच त्यांनी खासगीमध्ये दहावी पास केली. नोकरीत उत्तम शिक्षणकार्य सुरू असतानाच त्यांनी सामाजिक सेवाभावी वृत्तीने होमगार्डचे कार्य स्वीकारले. तेसुद्धा संस्था अध्यक्षांच्या परवानगीने.
शिक्षकीपेशा व होमगार्ड सेवा सुरू असताना ते कोराडी येथील होमगार्ड शिबिरामध्ये प्रशिक्षणाला गेले. तेव्हा त्यांनी आपला प्रभाव साहाय्यक शिक्षकांकडे सुपूर्द केला होता व कार्यमुक्त होऊन अकरा दिवसांचे प्रशिक्षणाला गेले. ४ जानेवारी १९६९ ला जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी लोकजीवन संस्थेच्या नावे दिलेल्या रिलीव्ह आदेश घेऊन ते शाळा सेवेत दाखल होण्यासाठी गेले. परंतु, अध्यक्षांनी तो अर्ज फेटाळला व त्यांना २४ डिसेंबर१९६८ ला शाळेतून काढून टाकले.
दरम्यान, त्यांचे आई-वडीलही मृत्यू पावले. त्यामुळे प्रपंचाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. नोकरी गेल्यामुळे ते चिंताग्रस्त असतानाच त्यांना अपरिहार्यपणे वडिलांच्या किराणा दुकानात बसणे सुरू केले. त्यातही निराशेने ते माघारले व गरिबी हालअपेष्टा सोसत मुला-मुलींचे शिक्षण व लग्नकार्य केले. कायदेशीरपणे नोकरी केल्यानंतरही त्यांच्यावर अन्याय झाल्याने वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा ते न्यायासाठी धडपड करीत आहेत. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, गृहमंत्रालय, कोर्टकचेरी, आमदार, खासदार, अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी उंबरठे झिजवले. परंतु, त्यांना न्याय मिळाला नाही. याची हुरहुर त्यांना अजूनही वार्धक्यात सतावत आहे.
सरपंचाची संधी मिळाली
प्रपंच, धंदा व संघर्ष सुरू असतानाच त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा ते सदस्य झाले. सभ्य, शालीन व नम्र स्वभाव गुणधर्माने दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना जनतेने सरपंचपद बहाल केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यकाळ आजही जनतेला आठवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.