वीज प्रकल्पांतील कोळशाचा वापर कमी करण्याचा अभ्यास करणार
नागपूर : जुन्या झालेल्या आणि औष्णिक वीज निर्मिती प्रदूषणकारी प्रकल्पांतील कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करता येईल यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच नांदगाव आणि वारेगाव येथील ॲश पॉण्ड कायमस्वरूपी बंद करण्यात येऊन त्या जागा वेगाने पूर्ववत केल्या जातील असे आश्वासनही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नांदवाववासीयांना दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील नांदगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, राज्यातील सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा सर्वंकष अभ्यास केला जाईल. जेणेकरून जुने झालेले आणि कोळसाधारीत प्रदूषित विद्युत निर्मिती केंद्रे पद्धतशीरपणे टप्प्या टप्प्याने कमी करता येतील. राज्यातील सर्व विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचे ऑडिट केले जाईल. जे प्रकल्प विहित मानकांची पूर्तता करत नसतील त्यांना निर्णायक कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रदूषण कमी करण्याबाबतची योजना ठरवली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. अभ्यासाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील घोषणा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदगावमधील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर कारवाई करून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. पुढील पंधरा दिवसात नांदगाव ॲश पॉण्डची जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या १५ ते १६ मार्चला परत एकदा आढावा घेऊ असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रावर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना, हवा प्रदूषणासाठी एफजीडी उभारणीसहीत केल्या जातील. त्याची सुरवात कोराडी आणि खापरखेडा येथून होईल. केंद्राच्या यमांनुसार फ्लाय अॅशचा १०० टक्के वापर केला जाईल असेही ठाकरे यांनी सांगितले.
७५ टक्के वीज निमित्ती औष्णिक
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीनुसार (महानिर्मिती) राज्याची विद्युतनिर्मिती क्षमता १३,६०२ मेगावॉट इतकी आहे. त्यापैकी कोळसाधारीत औष्णिक वीजेचे प्रमाण जवळपास ७५ टक्के म्हणजेच १०,१७० मेगावॅट इतके आहे. राज्याच्या मालकीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नाशिक, परळी, भुसावळ आणि पारस येथील विद्युतनिर्मिती केंद्रांचा समावेश होतो.
ठाकरेंचे स्वागत
नांदगाव येथील स्थानिकांनी ठाकरे यांना भेटून फ्लाय अॅशचा त्यांच्या जनजीवनावर कसा परिणाम झाला याची माहिती दिली. नांदगाव सरपंचाच्या नेतृत्वाखाली महिलांच्या गटाने मांडलेल्या व्यथा ऐकल्यावर पुढील दहा दिवसात स्थानिकांच्या रोजगार आणि विकासासाठी योजना तयार केली जाईल असे ठाकरे यांनी सांगितले.
आता कुठे कामाचा शुभारंभ
स्थानिकांच्या मदतीने येथील जमीन पूर्ववत: करण्याची योजना आखावी लागेल. आत्ता कोठे कामाची सुरवात झाली असून बराच पल्ला गाठायचा आहे.
-लीना बुद्धे, सीएफएसडी, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.