Nagpur News : शेतात वेगवेगळे प्रयोग करून आपल्या व्यवसायाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न दिनेश लोखंडे या युवकाने केला. मात्र, त्यात यश आले नाही. शेवटी यापेक्षाही काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी दिनेश रेशीम शेतीकडे वळला. त्यात त्याला यश आले. गुमगाव परिसरात रेशीम शेती करून दिनेशने शेकडो शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
हिंगणा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर गुमगाव आहे. महामार्गाचे नाव समृद्धी असले तरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी मात्र समृद्धी आली नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हैराण आहे. त्या निसर्गचक्र फिरल्याने शेती बेभरवशाची झाली आहे.
दुसरीकडे गाव नागपूर शहराला लागून असल्याने जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे तिथे गेले तिथे भूखंड विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. अशातच दिनेश लोखंडे या युवकाने तीन वर्षांपूर्वी रेशीम शेतीचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले असून त्या परिसरातील आणखी काही शेतकरी ही शेती करीत आहेत.
रेशीम शेती करण्यापूर्वी दिनेश लोखंडे यांनी बरेच व्यवसाय केले. त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही न खचता पुढे बायव्होल्टाइन रेशीम कीटक संगोपनाचा व्यवसाय व्यवस्थित नियोजन व व्यवस्थापन करून यशस्वी करून दाखविला.
त्यातून आर्थिक यश मिळवण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही रेशीम उत्पादक होण्यासाठी प्रेरणा तयार झाली आहे. नागपूरपासून २५ किलोमीटरवर गुमगाव आहे. सुमारे १२ ते १३ हजार लोकसंख्या आहे. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेतीच आहे. शहर नजीक असल्याने कपाशी, सोयाबीन यांच्या जोडीला भाजीपाला उत्पादनावरही गावकऱ्यांचा भर आहे.
गावातील दिनेश नारायण लोखंडे यांची बारा एकर शेती आहे. त्यांचीही भाजीपाला शेती होती. पण उत्पादन, खर्च व दर यांचे गणित जुळल्याने त्यांनी ही शेती थांबवली. सन २०१८-१९ मध्ये चार गायींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. डेअरीही सुरू केली. जोडीला बेकरी व्यवसाय होता. परंतु त्यातूनही जमा- खर्च ताळेबंद जुळला नाही.
सन २०१९- २० मध्ये कृषी विभागाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर रेशीम व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. त्यातून उत्सुकता वाढल्याने जिल्हा रेशीम कार्यालयाला भेट दिली. क्षेत्र सहायक नंदकुमार हागवणे यांच्याकडून व्यवसायातील बारकावे जाणून घेतले.
बुटीबोरी येथील संदीप निखाडे काही वर्षांपासून ही शेती करीत होते. त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय या क्षेत्रात पाऊल टाकणे जोखमीचे वाटल्याने वर्षभर त्यांच्या शेतात रावत संपूर्ण व्यवस्थापन शिकून घेतले.
आत्मविश्वास वाढल्यानंतर दिनेश यांनी व्यवसायाची पद्धतशीर आखणी व नियोजन केले. सव्वा एकरात व्ही वन जातीच्या तुतीची लागवड केली. ५५ बाय २२ फूट आकाराचे कीटक संगोपन शेड उभारले.
त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च आला. मेहनत, चिकाटी, इच्छाशक्ती व नेटके व्यवस्थापन यांच्या जोरावर आज तीन वर्षांच्या अनुभवानंतर या व्यवसायात स्थिरता येण्यास सुरुवात झाली आहे. वर्षाला ते सुमारे आठ बॅचेस घेतात. प्रत्येक बॅच दीडशे अंडीपुंजांची असते. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ८५ किलो रेशीम कोष अशी उत्पादकता मिळते.
अंडीपुंजांपासून कोष उत्पादन घेण्यासाठी सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आजच्या घडीला बरेच शेतकरी चॉकी खरेदी करतात. त्यामुळे हा कालावधी कमी होतो. परिणामी बॅचचा कालावधी सुमारे आठ ते दहा दिवसांनी कमी होतो. वर्षभरात आठ ते दहा बॅच काढतो. यातून एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याचे दिनेश लोखंडे यांनी सांगितले.
शेती हा व्यवसाय बेभरवशाचा आहे. नोकरी करण्यापेक्षा आपली शेती बरी म्हणून नोकरी सोडली. पण, शेतातूनही काही लाभ झाला नाही. भाजीपाल्याची शेती केली. यातून दलाल लुटत असल्याचे डोळ्यादेखत बघितले आणि हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. आता रेशीम शेती करणे सुरू आहे. यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. माझ्यासोबत आणखी काही शेतकरीसुद्धा ही शेती करीत आहे. बेंगळुरू, नांदेड येथून व्यापारी येतात. रेशीमची विक्री होते. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे.
-दिनेश नारायण लोखंडे, गुमगाव, ता. हिंगणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.