Nagpur Heat : नागपूरकरांना नवतपाने फोडला घाम! आठ दिवस केले भीषण लाटेने त्रस्त

अंगाची लाहीलाही करणाऱ्या नवतपाचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे रविवारी ओसरला.
Temperature
Temperatureesakal
Updated on

नागपूर - अंगाची लाहीलाही करणाऱ्या नवतपाचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे रविवारी ओसरला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा नवतपा चांगलाच तापल्याने शेवटच्या दिवसाचा अपवाद वगळता आठही दिवस नागपूरकरांसह विदर्भवासीयांना अक्षरशः घाम फुटला. भीषण लाट व विक्रमी तापमानाचा सर्वाधिक फटका यंदा ब्रह्मपुरी व यवतमाळकरांना बसला. भयंकर ऊन व उष्माघाताने अनेकांचा जीवही घेतला.

२५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळा नवतपा म्हणतात. या दिवसांत सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर पडत असल्याने उन्हाचे चटके अधिक तीव्र जाणवतात. त्यामुळे कमाल तापमानात प्रचंड वाढ होते. यावर्षी अवकाळी पावसाची कोणतीही चिन्हे नसल्याने नवतपा तापदायक ठरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे सूर्य नऊही दिवस अक्षरशः आग ओकला. नवतपामध्ये पाऱ्याने अनेक शहरांमध्ये विक्रमी उसळी घेतल्याचे वैदर्भींनी अनुभवले आहे.

गेल्या नऊ दिवसांतील तापमानावर नजर टाकल्यास, उन्हामुळे नागपूरकरही बेजार झाल्याचे आढळले. नवतपाच्या पहिल्या दिवशी (२५ मे) नागपुरात ४२.४ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर पारा सतत वाढत गेला. तब्बल चार दिवस उपराजधानीत ४५ किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात २७ मे रोजी नोंद झालेले ४५.६ अंश सेल्सिअस तापमान या मोसमातील उच्चांकी ठरले. ऊन व उकाड्यामुळे नागपूरकर चांगलेच घामाघूम झाले होते.

त्यामुळे पंखे व कुलरही प्रभावहिन ठरले. उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षी नवतपामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फारसे तापमान वाढले नव्हते. यावेळी मात्र तसे घडले नाही.

ब्रह्मपुरी व यवतमाळमध्ये उच्चांकी तापमान

यंदा बुलडाण्याचा अपवाद वगळता विदर्भात सगळीकडेच भीषण लाट राहिली. मात्र उन्हाचा सर्वाधिक फटका बसला तो ब्रम्हपुरी व यवतमाळकरांना. ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.१ अंशांवर गेला होता. येथे तब्बल चार दिवस विदर्भ व राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील उच्चांकही येथेच नोंदला गेला. यवतमाळमध्ये तीन दिवस पारा उच्चांकीवर गेला होता. सुदैवाने मे २०१३ मध्ये चंद्रपूरमध्ये नोंद झालेला ४८.२ डिग्रीचा व नागपुरातील ४७.९ डिग्रीचा विक्रम यावेळी देखील अबाधित राहिला.

उष्माघाताचेही अनेक बळी

भीषण उष्णलाट व उष्माघाताने यंदा नागपुरात अनेक बळी घेतले. नवतपाकाळात विशेषतः उत्तरार्धात शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर अनेक जण बेशुद्धावस्थेत आढळले. उल्लेखनीय म्हणजे यात वृध्दांसोबतच तिशी-चाळिशीतील व्यक्तींचाही समावेश होता. यावरून यावर्षी उष्णलाट किती भयंकर होती, याचा अंदाज येऊ शकतो.

विदर्भातील प्रभाव

तारीख - शहर - तापमान

२५ मे - यवतमाळ - ४६.६

२६ मे - यवतमाळ - ४६.०

२७ मे -ब्रह्मपुरी - ४७.१

२८ मे - वर्धा - ४५.२

२९ मे - ब्रह्मपुरी - ४६.७

३० मे - ब्रह्मपुरी - ४६.९

३१ मे - भंडारा - ४६.०

१ जून - ब्रह्मपुरी - ४६.५

२ जून - यवतमाळ = ४५.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.