नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम वेगाने सुरू आहे. नागपूरकर धावपटूंना लवकरच त्यावर सरावाची व खेळण्याची संधी मिळणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक असावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर ट्रॅकच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी ‘सकाळ’ला दिली. सूर्यवंशी म्हणाले, जुन्या शिंडर ट्रॅकचे व ड्रेनेज खोदकाम सुरू असून, उर्वरित कामही नॉन स्टॉप सुरू आहे. मध्येमध्ये कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
जवळपास दहा कोटी रुपये खर्च करून व विद्यापीठाच्या स्वतःच्या पैशातून बांधण्यात येत असलेल्या या ट्रॅकच्या बांधकामाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईच्या स्पोर्ट्स फॅसिलिटीजकडे सोपविले आहे. सिंथेटिक ट्रॅक एकूण आठ लेनचा राहणार आहे. ट्रॅकच्या बाजूला लांब उडी व तिहेरी उडीसाठी ‘जम्पिंग पीट’ राहणार आहे.
तसेच मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाईट्सची व्यवस्था आणि हातोडा व गोळाफेकीसाठी विशेष प्रकारचा पिंजरा राहणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, स्टीपलचेस इव्हेंट्सचीही यात सुविधा राहणार आहे. ट्रॅकच्या सभोवताल तारेचे कुंपण आणि चिखल होऊ नये, यासाठी आतील फुटबॉल मैदानावर कृत्रिम गवत लावण्यात येणार आहे.
विद्यापीठाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या ट्रॅकचा फायदा शहरातील सर्वच धावपटूंना होणार आहे. विशेषतः विद्यापीठाच्या खेळाडूंसाठी ही अविस्मरणीय भेट राहणार आहे. ट्रॅक पुर्ण झाल्यानंतर भविष्यात नागपुरात राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचेही आयोजन सहज शक्य होणार आहे. ट्रॅकअभावी विद्यापीठाला आतापर्यंत एकदाही आंतरविद्यापीठ स्पर्धांचे यजमानपद मिळू शकले नाही, हे उल्लेखनीय.
उपराजधानीत यापूर्वी मानकापूर येथेही सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्यात आता विद्यापीठाच्या ट्रॅकची भर पडणार आहे. एकाच शहरात दोन ट्रॅक होणार असल्यामुळे नागपूरकर धावपटूंसाठी हे दुहेरी गिफ्ट ठरणार आहे. मानकापूरचा ट्रॅक दूर पडत असल्यामुळे खेळाडूंसाठी थोडा त्रासदायक ठरत आहे. मात्र विद्यापीठाच्या ट्रॅकमुळे त्यांची ही अडचण निश्चितच दूर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.