Narendra Bunde : टीम इंडिया २०२७ मध्येही विश्‍वचषक जिंकणार! प्रसिद्ध ज्योतिषी व अंकशास्त्रज्ञ नरेंद्र बुंदे यांची भविष्यवाणी

याशिवाय भारताला कसोटी सामन्यांची ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (डब्ल्यूटीसी) जिंकण्याचाही योग असल्याचे त्यांनी सांगितले.
ICC's Team Of T20 World Cup 2024
ICC's Team Of T20 World Cup 2024 sakal
Updated on

नागपूर - कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकताच टी-२० वर्ल्डकप जिंकणारा भारतीय संघ २०२७ मध्येही ५० षटकांचा विश्‍वचषक जिंकेल, अशी भविष्यवाणी नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषी व अंकशास्त्रज्ञ नरेंद्र बुंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. याशिवाय भारताला कसोटी सामन्यांची ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (डब्ल्यूटीसी) जिंकण्याचाही योग असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट व भारतीय क्रिकेटपटूंशी संबंधित आतापर्यंत अनेक अचूक भविष्यवाणी करणारे ५६ वर्षीय बुंदे म्हणाले, रोहितच्या कुंडलीतील गुरू बलवान असून, शुक्र आणि शनीचा योगही अनुकूल आहे. यामुळे तो भारताला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनवू शकला. असाच योग भविष्यातही जुळून येत आहे. टी-२० तून निवृत्त झाला असला तरी, त्याच्या कुंडलीत आणखी एक विश्‍वचषक विजेतेपद आहे.

हा योग २०२७ मध्ये येणार आहे. पुढील तीन वर्षांत रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ ५० षटकांच्या विश्‍वचषकासह ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ही जिंकू शकतो. देशाला आणखी एक जागतिक करंडक जिंकून दिल्यानंतर तो आणि विराट कोहली वयाच्या ३७ वर्षांनंतर क्रिकेटमधून सेवानिवृत्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुंदे यांच्या मते, आगामी काळ रोहित व विराटशिवाय जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव व के. एल. राहुलसाठी खूप चांगला आहे. कसोटी आणि वनडेत भारतीय संघाची धुरा प्रामुख्याने यांच्याच खांद्यावर राहणार आहे. याशिवाय विराटप्रमाणे भविष्यात युवा शुभमन गिलची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ, ग्लॅमर व लोकप्रियता राहणार आहे. शिवाय तो कर्णधार म्हणूनही यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुंदे यांना क्रिकेटपटूंच्या जन्मतारखा, वेळ आणि त्यांच्या कुंडलीचा अभ्यास आहे.

त्यांनी सौरव गांगुली व सचिनसह जवळपास २५ क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले आहे.

सचिन, धोनी व विराटबद्दल सर्वाधिक अचूक भविष्यवाणी

नरेंद्र बुंदे यांनी बहुतांश भारतीय क्रिकेटपटूंबद्दल भविष्यवाणी केली. मात्र सर्वाधिक अचूक भविष्यवाणी सचिन, धोनी व विराटबद्दल खऱ्या ठरल्या आहेत. शतकांचे शतक करेल, टेनिस एलबोनंतर सचिन जोरदार कमबॅक करेल, पहिला वनडे द्विशतकवीर यासह सात भाकितांचा समावेश आहे. तर धोनी विश्‍वचषक जिंकेल, आयपीएल लकी राहील इत्यादींचा समावेश आहे. तर विराटचा अनुष्का शर्मासोबत विवाह, नंबर वन ब्रँड बनेल, यशस्वी कमबॅक करेल, टी-२० फायनलमध्ये चमकदार कामगिरी करेल या भविष्यवाणींचा समावेश आहे.

विराट मोडणार सचिनचा विक्रम

विराट कोहली हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम मोडीत काढणार असल्याचे आणखी एक भाकीत बुंदे यांनी केले आहे. विराटची कुंडली धनू राशीची असून, राशी कन्या आहे. शिवाय सध्या चंद्र-शुक्राची युती आहे. त्यामुळे निवृत्तीपूर्वी तो निश्चितच सचिनला मागे टाकणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, सध्या स्थितीत विराटच्या नावावर ७३ शतके आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.