Nagpur Temperature : नवतपाचा ‘सन’ताप; नागपूर ४५.२

विदर्भात नवतपाच्या उन्हाचे चटके सुरूच असून, बुधवारीही बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णलाटेचा तीव्र प्रभाव दिसून आला.
Temperature
Temperaturesakal
Updated on

नागपूर - विदर्भात नवतपाच्या उन्हाचे चटके सुरूच असून, बुधवारीही बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णलाटेचा तीव्र प्रभाव दिसून आला. नागपूरच्या पाऱ्याने आज पुन्हा उसळी घेत पंचेचाळीशी पार केली, तर ब्रह्मपुरी विदर्भासह राज्यात ‘हॉट’ राहिले. गुरुवारी चंद्रपूर वगळता विदर्भात यलो अलर्ट नसल्यामुळे आगामी काळात पारा खाली येऊन उष्णलाट काहीशी ओसरण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी शनिवारनंतर काही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या भीषण लाटेचा संपूर्ण विदर्भात सध्या धुमाकूळ सुरू आहे. लाटेने अख्ख्या विदर्भालाच आपल्या कवेत घेतले आहे. सध्या बुलडाणा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा ४२ अंशांच्या वर गेलेला आहे. नवतपा गेल्या चार-पाच दिवसांपासून नागपूरकरांची चांगलीच परीक्षा घेत आहे.

काल ४४.८ अंशांपर्यंत घसरलेला पारा आज पुन्हा उसळून ४५.२ वर गेला. तर ब्रम्हपुरीच्याही कमाल तापमानात दीड अंशाची वाढ होऊन पारा ४६.७ अंशांवर स्थिरावला. येथे नोंद झालेले तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले. याशिवाय भंडारा (४५.०), वर्धा (४५.०), चंद्रपूर (४४.२), गडचिरोली (४४.०), गोंदिया (४४.०) आणि यवतमाळ (४४.०) या जिल्ह्यांमध्येही उन्हाच्या लाटेचा तीव्रतेने प्रभाव जाणवला.

विकेंडपासून मॉन्सूनपूर्व पाऊस ?

उन्हाचा तडाखा सुरू असला तरी विकेंडपासून वैदर्भींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार किंवा त्यानंतर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविली आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा आलेख खाली येण्याची दाट शक्यता आहे.

उष्माघाताने वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू

उन्हाच्या तडाख्यामुळे उपराजधानीत मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहेत. दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने दोघांचा बळी घेतल्यानंतर आज एका वृत्तपत्र विक्रेत्याचाही ऊन सहन न झाल्याने मृत्यू झाला. उष्माघातामुळे इंदोरा बाराखोली रिपब्लिकननगर येथील वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे वितरक ३५ वर्षीय निखिल सुखदेवे (गोलू) मरण पावले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर दहनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरात संचारबंदीसदृश स्थिती

उन्हाचे चटके व असह्य उकाड्यामुळे नागपूरकरांसह ग्रामीण भागांतील नागरिकही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. उन्हामुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. परिणामतः रस्त्यांवरील वर्दळ रोडावली आहे. दुपारचे चित्र पाहता शहरात जणू काही अघोषित संचारबंदी आहे की काय, असा भास होत आहे. शिवाय उष्माघाताचेही बळी वाढू लागले आहेत. उन्हाच्या झळा सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत जाणवत होत्या. उन्हाच्या तीव्रतेपुढे पंखे व कुलरही कुचकामी ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.