Beedi : बिड्यांची विक्री घटल्याने तेंदुपाने युनिटची विक्री ५० टक्क्यांवर

मार्च महिन्यापासून राज्यात तेंदू विक्रीच्या तीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या
Tendupatta unit sales to 50 per cent Beedi health nagpur
Tendupatta unit sales to 50 per cent Beedi health nagpursakal
Updated on

नागपूर : ‘बिडी जलाईले जिगरसे पिया, जिगर मा बडी आग है’ या गाण्याचे वास्तव आज तरी ‘जिनको पिनी है, जिगरसे बिडीही पियो क्योंकी पेट मा बडी आग है’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. बिड्यांची मागणी कमी झाली आहे, तिची जागा सिगारेटने घेतली आहे.

याचा थेट परिणाम तेंदूपत्ता संकलनावर झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारांनीही तेंदू लिलावाकडे पाठ फिरवली आहे. तिसऱ्या निविदा प्रक्रियेनंतर २६४ पैकी फक्त १३३ युनिटची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावर्षी फक्त १५० पेक्षा अधिक तेंदू युनिटची विक्री होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मार्च महिन्यापासून राज्यात तेंदू विक्रीच्या तीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यात. त्यात फक्त ५० टक्केच युनिटची विक्री झाली आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत तेंदूच्या युनिटचा लिलाव करण्यात आला. त्या दोन्ही राज्यातील तेंदू युनिटची विक्री ९० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहे. त्यात मागील वर्षीचा दीड लाख तेंदू गोणी व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहेत. मागणीही कमी झालेली आहे.

त्याचा फटका तेंदू पानांच्या युनिट विक्रीला बसण्याचे संकेत मिळू लागले आहे. राज्य सरकारने यंदा तेंदू पानांच्या विक्रीतून मिळणारे संपूर्ण रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार ७२ कोटींची रक्कम तेंदू मजुरांना वाटण्यात येत आहे. मात्र, यंदा राज्य शासनाने तेंदूचा लिलाव उशिरा सुरू केल्याने तेंदू खरेदीदारांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परिणामी, राज्यातील लाखो कामगारांचा रोजगार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बिडीची जागा आता सिगारेटने घेतली आहे. बिडीच्या जागी सिगारेटचे कारखाने उभारले जात असून त्याचा व्यवसाय व्यापक झाला आहे. याचा थेट परिणाम तेंदूपत्ता संकलनावर झाला आहे. त्यामुळे काही वर्षांत तेंदूपत्त्याची मागणी कमी झाली आणि कंत्राटदारही काढता पाय घेऊ लागलेले आहेत.

वनविभागाकडूनही तेंदूपानांच्या लिलावासाठी हवा तसा पाठपुरावा केला जात नसल्यानेच लिलावाचा मुहूर्तही चुकला आहे. आता या पानावर कारखानदारांना २८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. बिडीचे नवीन ग्राहकही कमी झाले आहे. बिडी बंडलच्या दरात वाढ झाली आहे. याचा परिणाम तेंदूच्या व्यवसायावर झाला आहे.

अद्यापही १३१ तेंदू युनिटची विक्री झालेली नसली तरी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता अजून २० ते ३० युनिटची विक्री होईल, असे जाणकार सांगतात. बिडी कारखान्यातील कामगारांची संख्या मोठी आहे. उठाव नसल्याने खरेदी घटली आहे. यासोबत बिडी कारखान्यात निर्मितीचे कामही कमी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.