मेंढला (जि.नागपूर) : नरखेड तालुक्यातील संपूर्ण गावांतील एकूण सतराशे ते अठराशे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील 2018-19 या वर्षाचा शेती पीकविमा काढला. याच वर्षी अतिवृष्टी झाली. पीकविम्याचा साधा पंचनामा न करता विम्याची नुकसानभरपाईची रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या.
कुणीच बांधावर आले नाही.
कापूस, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांचा प्रत्येक शेतकऱ्याने पीकनिहाय विमा काढला. नेमकी या वर्षात अतिवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक मातीत मिळाले. पिकाच्या नुकसानीच्या आधारे संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्तदेखील घोषित करण्यात आला. पण, मिळालेली शासनाची मदत ही अत्यल्प होती. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता, त्याचा मोबदला मिळेल या आशेवर पीकविमाधारक अवलंबून होते. मागील वर्ष गेले आणि दुसरा खरीप हंगाम आलातरी मदत मिळाली नाही. बजाज अलायन्स कंपनीचा कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानाचे पंचनामे करण्यात आले नसल्याचे शेतकरी सांगतात.
रब्बी गेला, खरिप गेला आणि पुन्हा आला
संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला. पिकांची पूर्णपणे नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या हाताला पिकाचे काहीच लागले नाही. पीकविम्याचा आपल्याला मोबदला मिळणारच, अशी आस धरून तालुक्यातील संपूर्ण शेतकरी होते. पण, खरीप गेला, रब्बी गेला आणि आणि पुन्हा खरीप हंगाम तोंडाशी आला. तरीदेखील कंपनीने विम्याचा मोबदला दिला नाही.
कंपनीचे घूमजाव
सीएससी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरला आणि त्याची शेतकऱ्यांना पोचपावती मिळाली. याच पावतीवर कंपनीने हेल्पलाइन नंबर दिला आहे. या नंबरवर अनेक शेतकऱ्यांनी फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर काही शेतकऱ्यांना त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की, शासनाने तुमची कागदपत्रे आमच्यापर्यंत पोहोचविली नाही, तर काहींना तुमची कागदपत्रे चुकीची आहेत, असे उत्तर देऊन टोलविण्यात आले असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारीच नाही
पीकविम्याविषयी मी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय भारसिंगी येथे वारंवार गेलो. कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी या संदर्भात बोलणे केले. त्यांनी मला सांगितले की, येथील नियुक्त व्यक्ती आम्ही नसून दुसरेच कुणीतरी आहे. अधिकृत व्यक्तीचा अपघात झाल्याने त्याने मला तात्पुरते येथे थांबविले आहे. तुमच्या पीकविम्याविषयी मला कुठलीही माहिती नाही.
किशोर गणपत काटोले
शेतकरीकंपनीने रक्कम गडप केली
विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला असता, हे नियमित उडवाउडवीची उत्तरे देतात. यांच्या दिलेल्या उत्तरावरून तरी असे जाणवते की, प्रधानमंत्री पीकविमा नावाखाली याच कंपनीने शेतकऱ्यांची विम्याची संपूर्ण रक्कम गडप केली की काय?
-किशोर देवासे, शेतकरी
दोन दिवसांत तक्रार करणे गरजेचे
आमच्या कंपनीचे काही निकष आहेत. झालेल्या नुकसानाची 2 दिवसांत तक्रार करणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त (अतिवृष्टीग्रस्त) नरखेड तालुक्याच्या संदर्भात आम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची गाइडलाइन आलेली नाही. कुठलेच आदेश आले नाही. या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत कुठलीही सूचना दिलेली नाही, असे सांगितले.
-सागर राणे
कंपनीचे डाटा कॉर्डिनेटरकुठलाच लाभ मिळाला नाही
मी मागील वर्षी खरीप हंगामात कापूस या पिकाचा एक हेक्टरक्षेत्राचा विमा काढला आणि नेमका त्याच वर्षी अतिपावसाने माझ्या संपूर्ण पिकाची नासाडी झाली. पूर्णपणे पीक उद्ध्वस्त झाले. पण, कंपनीचा कुणीही अधिकारी पाहणी करण्यास आला नाही. अद्यापपर्यंत मला पीकविमा कंपनीकडून कुठलाच लाभ मिळाला नाही.
-चंद्रकला जांभूळकर
शेतकरी, खापा (घुडन)कंपनीचा प्रतिसाद नाही
पीकविम्यासंदर्भात मला संपूर्ण तालुक्यातून तक्रारी आल्या आणि याविषयी मी निगडित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने मी पत्रव्यवहाराद्वारे यांना विचारणा केली. पण, कंपनीने मला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. संपूर्ण तालुक्यातील पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी, पीकविमा वाटपाची सध्या स्थिती, अशी माहिती मी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे डाटा कॉर्डिनेटर सागर राणे यांना मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हा विषय मी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नरखेड येथे झालेल्या जनता दरबारातदेखील उपस्थित केला होता.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.