कोदामेंढी (मौदा) : मौदा तालुक्यातील निमखेडा जवळील शांतीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरातच आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
कुटुंब प्रमुखाने प्रथम पत्नी आणि मुलाची हत्या केली नंतर स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कुटुंबप्रमुख श्रीनिवास व्यंकटराव इडुपुगंटी (वय ५८), पत्नी पद्मलता श्रीनिवास इडुपुगंटी (वय ५४), मुलगा व्यंकटचंद्रशेखर श्रीनिवास इडुपुगंटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडा जवळील शांतीनगर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास कुटुंबप्रमुख श्रीनिवास यांच्या सुनेने आरडाओरड केल्याने शेजारी गोळा झाले.
लोकांनी बघितले असता पत्नी आणि मुलगा मृतावस्थेत आढळले. श्रीनिवास यांना नजीकच्या रुग्णालयात हलविले असता उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला होता. श्रीनिवास यांनी प्रथम पत्नी पद्मलता आणि मुलगा व्यंकटचंद्रशेखर यांचा दोरीने गळा आवळून ठार केले आणि त्यानंतर स्वतःला लाकडी कपाटाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. उत्तरीय तपासणी अहवालानंतर आणि तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.
याबाबतची तक्रार हरिचंद्रप्रसाद गंगाराजू इडुपुगंटी यांनी दिली. यानुसार पोलिसांनी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार निशांत फुलेकर करीत आहेत. घटनास्थळी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक धुमाळ, रामटेकचे उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश बळकते यांच्यासह अरोली पोलिस आले होते. शांतीनगर येथे पोलिस छावनीचे स्वरूप आले होते.
घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि फिंगर तपासणी पथक बोलावले. घटनास्थळावरून नमुने गोळा करण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मौदा येथे पाठविण्यात आले.
श्रीनिवास इळुपुगंटी यांनी पंढरा वर्षांपूर्वी अरोली निमखेडा रस्त्यावरील तुमान येथे व्यंकटेश राईस मिल उभारली. राईस मिलचा स्टीमसह मोठा प्लान्ट व गोदाम आहे. त्यांच्याकडे तीस एकरच्या जवळपास शेती आहे.
धान खरेदी करून त्याची मिलिंग करून तांदूळ मोठ-मोठ्या शहरात ते विक्री करायचे. मधल्या काळात धानाचे भाव कमी झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले होते. शेतकऱ्यांचे आणि बँकेचे कर्ज वाढले होते. त्यांचा पैशासाठी तगादा सुरू होता. असे बोलले जात असले तरी मृत्यूचे आणखी दुसरे कारण असू शकते असा संशयही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.