नागपूर - टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने लोक जेवणात टोमॅटोची चव विसरायला लागले आहेत. कुठे टोमॅटो १५० रुपये किलोने विकला जात आहे तर कुठे २०० रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटोची भाववाढ सुरू आहे.
टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजारात २५ रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर पडणारा हा दर येत्या काही दिवसात ६० रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वयंपाक घरात टोमॅटोचा तुटवडा चालू शकतो पण कांद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागू शकते, कमी पुरवठ्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव ६० ते ७० रुपये किलोपर्यंत वाढू शकतात. मात्र, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या वाढीनंतरही कांद्याचे भाव २०२० मध्ये वाढलेल्या कांद्याच्या किमतीपेक्षा कमीच राहणार आहेत. २०२० मध्ये कांद्याच्या भावाने १०० ते १२० रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता.
अस्थिरतेमुळे अधिक विक्री
रबी कांद्याच्या साठवणुकीचा आणि वापराचा कालावधी दोन महिन्यांनी कमी झाला आहे. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारातील अस्थिरतेमुळे खुल्या बाजारात रबीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी, सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरित्या कांद्यांचे साठे घसरण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच कांद्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.
स्वस्ताईसाठी आता दिवाळीची प्रतीक्षा
ऑक्टोबरपासून खरिपाची आवक सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा अधिक चांगला होईल. त्यामुळे भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या महिन्यांत (ऑक्टोबर-डिसेंबर) किंमतीतील अस्थिरता दूर होण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी-मे दरम्यान कांद्याचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरण्याकडे पाठ फिरवली आहे. तरीही कांद्याची टंचाई जाणवणार नाही असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.