Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करीत दगडाने ठेचून निर्घूण हत्या करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने तिहेरी फाशी, तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Sanjay Puri
Sanjay Purisakal
Updated on

नागपूर - पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करीत दगडाने ठेचून निर्घूण हत्या करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने तिहेरी फाशी, तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय देव पुरी (रा. लिंगा, ता. कळमेश्वर) असे या नराधमाचे नाव आहे. तिहेरी फाशी दिली जाण्याची नागपुरातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

न्यायाधीश एस. आर. पडवळ यांनी हा निर्णय दिला. कळमेश्वर येथील लिंगा शिवारातील शेतात ८ डिसेंबर २०१९ रोजी पीडित मुलीचा मृतदेह आढळला होता. तर, घटना ६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात मुलीच्या आईचे पालकही राहात असत. ही मुलगी कधी-कधी तिच्या आजीकडे खेळायला व झोपायला जात असे.

घटनेच्या दिवशी दुपारी ती घरून निघाली. मात्र, रात्री परतली नाही. दुसऱ्या दिवशी तिची आई सकाळी अकराच्या सुमारास आपल्या आईकडे मुलीला घ्यायला गेली. परंतु, मुलगी आदल्या दिवशी तेथे आलेली नसल्याचे उघडकीस आले. शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

पुढे ८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना गावातील एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडात कापडाचा बोळा व काड्या कोंबलेल्या होत्या. तर, दगडाने ठेचून तिची हत्या झाली होती. हे शेत नागपुरातील रहिवासी संजय भारती यांचे होते. आरोपी संजय पुरी याच शेतात गडी होता. न्यायालयाने एकूण २६ साक्षीदार तपासत आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणी विशेष सरकारी म्हणून वकील म्हणून ॲड. प्रशांत सत्यनाथन यांची नियुक्ती झाली होती. तर, आरोपीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ॲड. एस. एम. काझी व हेमंत झा वकील म्हणून उपलब्ध करण्यात आले होते.

दोन महिन्यांपासून पाळत

काही जणांनी या मुलीला संजयसोबत अखेरचे बघितल्याचे समोर आले. संजय उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तसेच, संजयच्या अंर्तवस्त्रांवर व त्याच्या रुमालावरील रक्ताचे डाग हे मृत मुलीचे असल्याचे चाचणीतून समोर आले होते.

या तीन कायद्यात फाशी

नराधम संजयवर अपहरण, खून, अत्याचार व बाल लैगिक कायदा (पोक्सो) अशा विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने खून (कलम ३०२), अत्याचार (३७६ अ, ब) आणि पोक्सो (कलम ६) अशा तीन कायद्यान्वये नराधम संजयला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच, अपहरण केल्याने सात वर्षे कारावास, पोक्सो कलम ४ मध्ये सहा महिने कारावास व दहा हजार दंड आणि पोक्सो कलम दहा मध्ये सात वर्षे कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली. त्यासाठी न्यायालयाने एकूण २६ साक्षीदार तपासले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.