गोवंशाच्या पूजनासोबतच आरोग्य तपासणीही

वसुबारसेला पशुधनाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा गवंडीतील अभिनव उपक्रम
Vasu Baras cow worship livestock health check up
Vasu Baras cow worship livestock health check up
Updated on

नागपूर : भारतीय सण हे कृषक संस्कृतीवर आधारित आहेत. दिवाळीही याला अपवाद नाही. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पशुधनाप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गायवासराचे पूजन केले जाते. पण ही कृतज्ञता केवळ पूजा करण्यापुरती सीमित न ठेवता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुनिदान शिबिर या दिवशी घेण्याचा अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील गवंडी या गावात गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे.

पशुधन हे शेतीसाठी महत्त्वाचे असले तरी पशूंच्या आरोग्याविषयी पुरेशी सजगता आजही ग्रामीण भागात नाही. त्यामुळेच बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथील महिला शेतकरी माधवी अमरावतकर यांना पशूंचे आरोग्य तपासण्याची अभिनव कल्पना सूचली. वसूबारसच्या दिवशी होणाऱ्या गायवासराच्या पूजेच्या निमित्ताने जनावरांसाठी असे आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या मदतीला प्रशासनही आले.

त्यांनी प्रशासनाच्या मदतीने बाभुळगाव तालुक्यात पशूंसाठी मोफत आरोग्य शिबिर वसुबारसला घेणे सुरू केले. या शिबिरात पशुवैद्यकांकडून पशूंची आरोग्य तपासणी, रोगनिदान होऊ लागले आणि पशुपालकांमध्ये पशुआरोग्याविषयी जागरुकता निर्माण झाली. त्यासोबतच त्याच दिवशी गोपालन करणाऱ्या गोपालकांचा सपत्निक सत्कार करण्याची प्रथाही त्यांनी सुरू केली. या उपक्रमाचे महत्त्व लोकांच्याही लक्षात येऊ लागले व आता या उपक्रमाची संकल्पना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-ढाणकी आणि सात-आठ गावांमध्ये विस्तारीत झाली आहे.

वसुबारसेची परंपरा

  • वसु म्हणजे धन. गोवंश हे शेतकऱ्यांचे धनच आहे. गाईंचे हे उपकार फेडण्यासाठीच वसुबारसेला गाईची तिच्या वासरासह पूजा करण्याची परंपरा आहे.

  • महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारताच्या काही भागात वसुबारस साजरी केली जाते.

  • विदर्भाच्या काही भागात या दिवशी पशुधन चरायला नेणाऱ्या समाजातील पुरुष गवळणींचा स्त्री वेष परिधान करून पारंपरिक नृत्य करीत घरोघरी दक्षिणा मागतात.

  • गुजरातमध्ये याला बाग बरस, तर दक्षिण भारतात नंदिनी व्रत म्हणतात.-

  • वसुबारसेच्या दिवशी सकाळी सडा सारवणं करून रांगोळी काढली जाते. घरातील देवांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. संध्याकाळी दारासमोर पणत्या लावल्या जातात. गाय-वासराची मनोभावे पूजा केली जाते.

  • गाईला बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेगांच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घातला जातो.

  • या दिवशी काही ठिकाणी शेतकरी गाईचे दूध न काढता ते वासरालाच पिऊ देतात.

पौराणिक कथा

या महोत्सवाची सुरवात पुराणातील समुद्र मंथनाशी संबंधित आहे. अमृतप्राप्तीसाठी देव आणि राक्षसांनी केलेल्या समुद्रमंथनात कामधेनू नावाची गाय समुद्रातून बाहेर आली. स्वर्गातली ही गाय देवांनी सप्तर्षींच्या हवाली केली आणि कालांतराने ती वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली. इच्छित फल देणाऱ्या या कामधेनूचे पूजन तेव्हापासून केले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.