दक्षिण नागपुरात पाण्यासाठी हाहाकार

बोअरवेल आटल्या, टॅंकरही आठवड्यातून एकदाच
बोअरवेल आटली असली तरी त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करताना महिला.
बोअरवेल आटली असली तरी त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करताना महिला. Sakal
Updated on

नागपूर - शहरात नळ असलेल्या भागांमध्येही तांत्रिक कामामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये जलवाहिनी पोहोचली पण नळ पोहोचले नसल्याने नागरिकांना बोअरवेल व टॅंकरवरच तहान भागवावी लागत आहे. पण गेल्या काही दिवसांत बोअरवेलचेही पाणी आटले. त्यात टॅंकर आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने या वस्त्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दक्षिण नागपुरातील रिंग रोडपलिकडील श्रीकृष्णनगरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई आहे. मागील काही दिवसांत कडाक्याच्या उन्हाने या भागातील विहीरी व बोअरवेलही आटल्या. आठवड्यातून केवळ दिवस टॅंकर येत असल्याने येथील नागरिकांना बोअरवेलचा मोठा आधार होता. परंतु त्यातील पाण्यानेही साथ सोडल्याने येथील नागरिकांपुढे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बोअरवेल दुरुस्तीसाठी येथील नागरिकांनी अनेकदा या परिसरातील माजी नगरसेवकांकडे पाणी भरले. परंतु त्यांच्याकडूनही अल्पप्रतिसाद मिळाला. आता नगरसेवक पदच नसल्याने त्यांनीही टाळाटाळ केली. महापालिकेकडून केवळ नळाचे स्वप्न दाखविण्यात येत आहे. जलकुंभ तयार झाल्यानंतर पाणी येईल, असे गेल्या अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहे.

तहानलेल्या वस्त्या

श्रीकृष्णनगरच नव्हे तर चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, गजानननगर, शारदानगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी संपूर्ण वस्तीत जलवाहिनी टाकूनही महापालिकेने भगवतीनगरवासींना तहानलेलेच ठेवल्याचे दिसून येत आहे.

सायकल, दुचाकीवरून आणतात पाणी

या परिसरातील नागरिकांकडील विहिरीही आटल्या असून टॅंकरचालकांकडून दहा दिवसांतून केवळ एकदाच टॅंकर येत असल्याने भर उन्हात येथील नागरिक दुचाकी, सायकलवरून दूर भागातून पाणी आणण्याची कसरत करीत आहेत. नागरिकांनी अनेकदा निवेदन, तक्रारी देऊनही लोकप्रतिनिधी, महापालिकेने येथील नागरिकांवर वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

दहा फूटावरील वस्तीत पाणी

भगवतीनगरच्या बाजूलाच शेषनगर असून येथील शिल्पा सोसायटीमध्ये सहा महिन्यांपूर्वीच जलवाहिनी टाकण्यात आली. येथील जलवाहिनी सुरू करण्यात आली. परंतु पाच वर्षांपासून दहा फूट अंतरावर असलेल्या भगवतीनगरात पाणी सुरू करण्यात आले नसून महापालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

विहिरीतून फेब्रुवारीतच पाणी गायब

यावर्षी फेब्रुवारीमध्येच विहीर आटली. त्यामुळे फेब्रुवारीपासून पाणीसंकट तीव्र झाल्याचे परिसरातील युवराज देवासे, पांडुरंग निलटकर, कुसुम महाजन, सुरेखा घवघवे यांनी सांगितले. या परिसरात माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी जलवाहिनी आणली. परंतु आताचे आमदार तसेच माजी नगरसेवक नागरिकांच्या घरापर्यंत पाणी आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

नागरिकांना मागितले जातात पैसे

नळ नसलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु प्रशासक नियुक्तीनंतर टॅंकरवाल्यांचीही मनमानी सुरू असून नागरिकांकडून पैशाचीही वसुली केली जात असल्याचे काही नागरिकांनी नमुद केले. पैसे घेतल्यानंतरही वेळेत पाणी मिळत नाही. आठवड्याभरात एक टॅंकर दिले जात असल्याचा गवगवा महापालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात दहा ते बारा दिवसांनी टॅंकर येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

बोरवेलवर रात्रभर गर्दी

जलस्तर खाली गेल्याने या बोरवेलला दिवसभर पाणीच नसते. पंप करताना नागरिकांचे हात दुखतात पण पाणी मिळत नाही. रात्रीला जलस्तर थोडाफार उंचावतो. त्यामुळे रात्री बारानंतर या बोरवेअलवर गर्दी असते. अनेकदा रात्री तीन वाजेपर्यंत नागरिक येथून पाणी भरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.