Nagpur Crime : पतीपासून मूल होत नसल्याने केले बाळाचे अपहरण...महिला अडकली पोलिसांच्या जाळ्यात

Baby Kidnapping : दुसऱ्या पतीसोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात सूर्यकांता घरातून पळून गेली. मूलं होत नसल्याने ती तणावात होती.
woman abducted a baby from nagpur railway station police arrest
woman abducted a baby from nagpur railway station police arrest Sakal
Updated on

Nagpur News : दुसऱ्या पतीपासून मूल होत नसल्याने रेल्वेस्थानकावरून सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने अटक केली. बाळ सुखरूप असून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे पोलिस यंत्रणा हादरली होती. अखेर बाळ सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. सूर्यकांता विश्वनाथ कोहरे (४०) रा. पुसला ता. वरूड, जि. अमरावती असे अपहरण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

दुसऱ्या पतीसोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात सूर्यकांता घरातून पळून गेली. मूलं होत नसल्याने ती तणावात होती. पहिल्या पतीपासून तिला दोन अपत्य आहेत. नंतर तिने विश्वनाथ सोबत लग्न केले.

तिने यापूर्वीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्याने मूलबाळ होऊ शकत नव्हते. यामुळे दोघेही व्यथित होते. आपल्यालाही बाळ असावे आणि त्याचे लाड पुरविता यावेत, अशी तिची इच्छा होती. त्यात बडनेरा ते नागपूर प्रवासा दरम्यान तिला ६ महिन्यांच्या बाळाचा लळा लागला आणि संधी मिळताच तिने बाळ चोरून पोबारा केला होता.

ललिता आणि उमाकांत इंगळे (३०) रा. अम्रापूर, ता. राजुरा असे पीडित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या स्वाधीन बाळ करण्यात आले. ललिताच्या माहेरी गोंदियाला जाण्यासाठी दोघेही मोठा मुलगा सागर आणि धाकट्या रामसह बुधवारी बडनेरा स्थानकावर आले होते. स्थानकावरच त्यांची सूर्यकांतासोबत ओळख झाली.

अपहरणकर्ती महिला पोलिसांच्या जाळ्यात

सर्व जण पुणे-हटिया एक्स्प्रेसने मध्यरात्रीनंतर २ वाजता नागपूर स्थानकावर उतरले आणि फलाट क्रमांक ४ वरच झोपी गेले. सूर्यकांताही जवळच होती. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ललिता यांना जाग आली. त्यावेळी कुशीत झोपलेला राम जागेवर नव्हता. स्थानकावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता सूर्यकांताचे कृत्य समोर आले.

लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने सूर्यकांताला पकडून बाळाला वैद्यकीय तपासणीनंतर आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा काशीद यांच्या मार्गदर्शनात प्रवीण खवसे, रोशन मोगरे, मजहर अली, संजय पटले, महिंद्र मानकर यांनी केली.

नागपूर-वर्धा मेमूने अपहरण

रागाच्या भरात सूर्यकांता बुधवारी निघून थेट बडनेरा स्थानकावर पोहोचली. तिथून नागपूरपर्यंत इंगळे दाम्पत्यासोबतच प्रवास केला. यादरम्यान तिने बाळाला खेळवले. यातून तिला लळा लागला. नागपुरात आल्यावरही तिचे संपूर्ण लक्ष बाळाकडेच होते. गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संधी मिळताच ती बाळाला घेऊन नागपूर-वर्धा मेमूतबसून निघून गेली.

लोहमार्ग पोलिसांनी घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. ती बाळाला घेऊन घरी गेल्याचे पुढे आले. संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांना सक्तीही दाखविता येत नव्हती. यामुळे पतीला वेगळे करून पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याने लगेच पत्नी कुठूनतरी बाळाला घेऊन आल्याचे मान्य केले आणि अपहरणाचे बिंग फुटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.