कुटुंब कल्याणाची जबाबदारी महिलांचीच का? सहा वर्षांत फक्त १,५४० पुरुषांनी केली नसबंदी

Womens initiative for family welfare as compared to men
Womens initiative for family welfare as compared to men
Updated on

नागपूर : आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा १३० कोटींवर गेला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात ‘कुटुंब कल्याण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. मागील सहा वर्षांच्या काळातील आकडेवारीचा विचार केल्यास कुटुंब कल्याणासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांचाच पुढाकार अधिक असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय अशा ५४ केंद्राच्या माध्यमातून २९ हजार ५५८ स्त्रियांनी शस्त्रक्रिया केल्या तर ३६ हजार ७९४ महिलांनी (ट्युबेटॉली, तांबी) बसवून कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेतला. यातुलनेत फक्त १,५४० पुरुषांनी नसबंदी केली आहे.

जिल्ह्यातील १,८००वर गावांमधून कुटुंब कल्याणासाठी स्त्रियांसह पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आजही महिलांचेच प्रमाण अधिक असल्याचे मागील सहा वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते. अपत्य प्राप्तीपासून ते गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा कालावधी अन् पुढे बाळंतपणाच्या वेदना हे सर्व महिलेलाच सोसावे लागते. त्यानंतर किमान कुटुंब कल्याणासाठी पुरुषांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना त्यांचा वाटा कमी असणे ही शोकांतिका आहे.

कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थींना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पद्धतीत व तात्पुरती पद्धती असे दोन प्रकार आहेत. कायमच्या पद्धतीमध्ये स्त्री शस्त्रक्रिया व पुरुष शस्त्रक्रियेचा समावेश आहे. स्त्री शस्त्रक्रियांमध्ये टाक्याचा व बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी, गर्भनिरोधक गोळ्या आदींचा वापर केला जातो.

राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य केंद्र, कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविली जाते. यामुळे काही अंशी बाल जन्मदराचे प्रमाणही आटोक्यात आल्याचे बोलले जात आहे. यंदा वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे या कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रियांमध्ये चांगलीच घट झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

पुरुषांच्या मनात अनेक गैरसमज

कुटुंब कल्याण योजनेत पुरुषांशी सहभागी न होण्याचे कारण म्हणजे नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल त्यांच्या मनात असलेला गैरसमज हे एक प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते. यामुळे ग्राम पातळीवरील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.

लाभार्थ्यांना मिळतो अनुदान

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांना शासनाकडून अनुदानही देण्यात येते. यात बीपीएल (महिला) सहाशे रुपये, नॉन बीपीएल (महिला) दोनशे पन्नास रुपये व पुरुषांना अकराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर वळते करण्यात येते. लाभार्थ्यांना अनुदान केवळ शासकीय रुग्णालय किंवा शासनाकडून मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्येच ही शस्रक्रिया केल्यास मिळते.

वर्षनिहाय शस्त्रक्रिया

वर्ष उद्दिष्ट महिला (शस्त्रक्रिया) पुरुष (शस्त्रक्रिया)
२०१५-१६ १२,१०२ ७,१४२ ४५१
२०१६-१७ १२,१०२ ६,२४८ ३०५
२०१७-१८ १२,१०२ ५२२८ २०८
२०१८-१९ १२,१०२ ४,७८१ २०६
२०१९-२० १२,१०२ ५,१६३ ३५६
२०२०-२१ १२,१०२ ९९६ १४

पुरुषांनेही पुढाकार घ्यायला हवा
कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर (ग्रामीण) भागात दरवर्षी विभागाच्या वतीने शिबिर घेण्यात येते. यामुळे बाल जन्मदर हा आटोक्यात आला आहे. महिलांप्रमाणेच कुटुंबाच्या कल्याणासाठी पुरुषांनेही पुढाकार घ्यायला हवा. शासनाच्या योजनेचा अधिकाअधिक लोकांनी लाभ घ्यावा.
- डॉ. दीपक सेलोकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.