जागतिक पुस्तक दिन विशेष
World Book Day 2024 : वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा देण्यासाठी, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सचिन सावरकर ‘पुस्तक दोस्ती’ असे अनोखे अभियान दशकापासून राबवित आहेत. बदलत्या जीवनशैलीने वाचकांच्या हातून कधी पुस्तक हिसकावून घेतले. चिमुकल्यापासून तर ज्येष्ठांच्या हाती आले ते ‘स्मार्टफोन.’
स्मार्टफोनच्या नादात प्रत्यक्ष पुस्तके घेऊन वाचणारी पिढीच हरवली. वाचन संस्कृतीत जीव ओतण्यासाठी सचिन सावरकर प्रयत्न करीत आहे. रखरखत्या उन्हात, बरसत्या धारांमध्ये तर थंडीच्या दिवसातील हुडहुडी असताना ते विदर्भाच्या गावखेड्यात पोहोचतात.
गावातल्या पहिल्या भेटीत १० ते २० वयोगटातल्या मुला मुलींना एकत्र आणतात. वाचनाचे महत्त्व सांगतात. थोर पुरुषांनी पुस्तक वाचले. ते शास्त्रज्ञ बनले. समाज सुधारक बनले. असे सांगत अभिनयाच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधतात.
मुलांना निःशुल्क पुस्तके भेट देऊन दुसऱ्या भेटीत विद्यार्थ्यांना ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर भाषण करायला लावतात. त्याला बक्षीस देतात. लहान मुले बोबड्या भाषेत व्यक्त होतात. दर आठवड्याला एक नवीन पुस्तक वाचण्याची सवय लावतात. पदरचे पैसे खर्च करतात. या अभियानाला चळवळीचे रुप येत असून ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे सावरकर सांगतात.
गावातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याची किमया पुस्तक दोस्ती अभियानाने साधली आहे. वाचन संस्कृतीला ऊर्जा मिळत आहे. शेकडो गावातून आता फोन येतात. नवीन पुस्तकांची मागणी मुले करीत आहेत. पुस्तक दोस्ती चळवळीला आता शीलवंश थूल, उमेश कापकर, विजय कोल्हे, सुरेंद्र बेलूरकर, शैलेश जाधव, संकेत देशमुख, प्राजक्ता लोखंडे, अनिता येवले, शीतल सावरकर ही मंडळी जुळत आहे.
- सचिन सावरकर, संयोजक, पुस्तक दोस्ती अभियान.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.